…म्हणून कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतलेल्यांना तिसरा डोस घ्यावाच लागणार; सायरस पूनावालांनी सांगितलं कारण

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. पहिले दोन डोस घेऊन झाल्यानंतर सहा महिन्यांनी लसीचा परिणाम कमी होत असल्याचं अभ्यासामध्ये दिसून आलं आहे. त्यामुळेच तिसरा डोस घेण्याची गरज असल्याची माहिती पूनावाला यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिलीय. सहा महिन्यानंतर कोव्हिशिल्ड लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं निरिक्षण समोर आलं आहे. यावर पूनावाला यांनी कोव्हिशिल्डच्या बुस्टर डोसचा पर्यायही सुचवला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सायरस पुनावाला यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यावेळी त्यांनी परखड आणि स्फोटक मते व्यक्त केली.

कोव्हिशिल्डच्या प्रभावासंदर्भात बोलताना पूनावाला यांनी मी स्वत: तिसरा डोस घेतला असल्याचं सांगितलं. इतकच नाही तर कंपनीतील सात-आठ हजार कामगारांनाही आपण तिसरा डोस दिल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. “सहा महिन्यांनी लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. लस दिल्यानंतरचा मेमरी सेल कायम शरीरामध्ये राहतो मात्र लसीचा प्रभाव कमी होतो. मी स्वत: तिसरा डोस घेतलाय. सिरममध्ये जे सात-आठ हजार कामगार आहेत त्यांनाही आम्ही तिसरा डोस दिलाय,” असं पूनावाला म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहनही केलंय. “ज्यांना कोव्हिशिल्डची लस घेऊन सहा महिने झालेत त्यांना माझी विनंती आहे की तिसरा डोस त्यांनी घ्यायलाच पाहिजे,” असं मत पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे.

लॉकडाऊन नकोच, निष्काळीजपणामुळे लोक दगावले

यावेळी त्यांनी लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं. लॉकडाऊन नसावा. एकदाच किड जाईल आणि लोकांना हर्ड इम्युनिटी मिळेल. खूप लोकं मरत असतील तर लॉकाडाऊन उत्तम आहे. पण लो रेट असताना 50 ते 60 टक्के लोक मेले ते निष्काळजीपणाने मेले. कोणी दवाखान्यात वेळेवर गेले नाहीत, कुणाकडे उपचारासाठी पैसे नव्हते तर काही लोक देवाच्या भरवश्यावर राहिले. विविध कम्युनिटीच्या लोकांनी तर सुरुवातीला उपचार नाकारले आणि व्हॅक्सिनही नाकारली. पण आजाराचा प्रकोप वाढल्यानंतर ते रुग्णालयात आले. त्यामुळे उशिर झाला होता. दवाखान्यात तात्काळ येऊन उपचार घेतला तर मृत्यूचं प्रमाणही कमी होतं, असं त्यांनी सांगितलं.

लोकांच्या दु:खातून पैसा कमवायचा नाही

राज्यातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि व्हॅक्सिनची मागणी कमी झाली तर मला काही फरक पडणार नाही. मला लोकांच्या दु:खातून पैसा जमवायचा नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कॉकटेल लस नकोच

यावेळी त्यांनी कॉकटेल लस देण्यास विरोध केला. मी कॉकटेल लसच्या विरोधात आहे. मिक्सिंगची गरज नाही. अशा लसीचा परिणाम चांगला निघाला नाही तर एकमेकांवर दोषारोप होईल. सीरम म्हणेल त्यांची लस चांगली नाही. तर समोरची कंपनी म्हणेल सीरमच्या लसीमुळे गडबड झाली. त्यामुळे एकमेकांवर आरोप होण्यापलिकडे दुसरं काही होणार नाही, असं ते म्हणाले.

इतर लसींचं उत्पादन कमी झालं

वर्षे अखेरीपर्यंत भारताचं व्हॅक्सिनेशन पूर्ण होईल का? आणि 45 कोटी डोस येतील का तुम्हाला काय वाटतं? असा सवाल पुनावाला यांना करण्यात आला. त्यावर, सर्वांची अपेक्षा आहे आपल्याला लस मिळायला हवी. पण ते वाटतं तितकं सोपं नाही. आमच्या 20 लसींचं महिन्याचं उत्पादन 10 कोटी होतं. पण आता आम्ही या एका लसीचं 10 कोटी उत्पादन करतो. त्यामुळे बाकीच्या लसींचं उत्पादन थोडं मागे पडलं आहे, असं ते म्हणाले.

तरीही मी सीरम सुरू केली

विविध देश शाळा सुरू करत आहेत. त्याचा काय परिणाम आहे. ते पाहून आपण पुढे गेलं पाहिजे. एक दोन वर्षे शाळा नाही सुरू झाल्या तरी आपण घरीच अभ्यास करू शकतो. मी कधी कॉलेजमध्ये जात नव्हतो. पवार साहेब मला हसायचे. हा कँटिनमध्येच भेटलं हे त्यांना माहीत असायचं. मी वर्गात जात नव्हतो. तरीही मी सीरम इन्स्टिट्यूट बांधली. हवं तर विचारा शरद पवारांना, असं ते म्हणताच एकच खसखस पिकली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.