साताऱ्यात सीरिअल किलिंगचा धक्कादायक प्रकार, पत्नी आणि प्रेयसीची हत्या करुन शेतात पुरलं
सातारा : देशभर गाजलेल्या सीरियल किलर डॉक्टर संतोष पोळनं केलेल्या हत्याकांडासारखाच आणखी एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात उघड झाला आहे. साताऱ्यातील संतोष पोळनं जी मोडस ऑपरेंडी वापरून अनेक महिलांचे खून केले होते. तशाच पद्धतीने या आरोपीने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्ट रोजी असे दोन खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेळगांव मधून अटक केली आहे.या दुहेरी हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन गोळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वाई तालुक्यातील व्याजवाडी गावात राहणाऱ्या नितीन गोळे या आरोपीने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्टला एक असे दोन खून केल्याचं समोर आलं आहे .पत्नी आणि प्रेयसी या दोघींचे खून इतर पुरुषांशी असलेल्या अनैतिक संबंधातून झाल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सातारा बस स्थानकावरून ३१ ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या संध्या विजय शिंदे (वय ३४, रा. कारी, ता. सातारा) या विवाहितेचा असले (ता. वाई) परिसरात खून झाला होता. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून खून करणारा संशयित नितीन गोळे (व्याहळी ता. वाई) हा संशयित फरारी होता. त्याला पकडण्यासाठी भुईंज येथून पोलीस पथके रवाना झाली होती. संशयित आरोपीला पोलिसांनी कर्नाटकातून दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते.
पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत असताना त्याने अडीच वर्षांपूर्वी पत्नी मनीषा (वय ३४) चाही खून करून मृतदेह डोंगर परिसरात पुरल्याचे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा खून करते वेळी त्याची दोन लहान मुले तिथेच होती. आपल्या लहान मुलांच्या समोरच या नराधमाने पत्नीचा खून केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. नितीनने पत्नी मनीषा गोळेचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, त्या ठिकाणी जाऊन खोदकाम करत पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला.सातारा पोलीस बुधवारपासून जंगलात खोदकाम करत होते. दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी स्वयंघोषित डॉक्टर संतोष पोळ याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने सहा खून करून ते स्वत:च्या फार्महाउसध्ये पुरल्याचे उघडकीस आले होते. त्याची आज पुनरावृत्ती झाली.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. वाई पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे खराडे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस कर्मचाऱ्यांनी याकामी शिकस्त केली.अधिक तपास पोलीस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.
कोण आहे नितीन गोळे
नितीन गोळे साताऱ्यातील वाई तालुक्यातील व्याजवाडी गावात राहणारा आहे. नितीन आर्मी मध्ये भरती झाला होता. पण अवघ्या दोन महिन्यातच तो तिथून पळून आला आणि सध्या शेती करत होता.
नितीन गोळेने सध्या दोन खुनाची कबुली दिली आहे. अजून काही खून केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!