भीषण अपघात ! पानशेत धरणात कार कोसळून महिलेचा बुडून मृत्यू
खडकवासला : रस्त्यावरुन जात असताना अचानक टायर फुटल्याने कार रस्त्याच्या कडेला घसरत जाऊन पानशेत धरणाच्या पाण्यात कार पडली. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर पती आणि मुलगा वाचले आहेत. ही घटना कादवे गावच्या स्मशानभूमी जवळ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
समृद्धी योगेश देशपांडे (वय ३३ ,रा.शनिवार पेठ पुणे ) असे मयत महिलेचे नाव असून योगेश देशपांडे ( वय ३५) यांच्या प्रसंगाधानाने स्वतःचे व मुलगा चिराग देशपांडे ( वय १५) यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. या प्रकरणी वेल्हे पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देशपांडे कुटुंबातील हे तिघेजण पुण्याहूण पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते. कुरण गावाच्या पुढे आल्यावर एका हॉटेलवर ते थांबले त्यानंतर त्यांनी कार धरणाच्या बाजूला नेली. पाऊस असल्याने ते कारमध्ये बसले होते, कारमध्येच त्यांनी नाश्ता केला. त्यांनतर दुपारी दोन वाजता ते पुढे कादवे गावाच्या दिशेने निघाले. योगेश कार चालवत होते आणि त्यांच्या शेजारी मुलगा बसला होता. मागे पत्नी समृद्धी बसल्या होत्या. धरणाच्या पाण्याच्या बाजूने कार चाललेली असताना अचानक कारचा टायर फुटल्याने योगेश यांनी कारवरील नियंत्रण गमावलं आणि कार रस्ता सोडून पाण्यात जाऊन पडली. सुरुवातीला काही वेळ कार पाण्यात तरंगत होती. पण नंतर पाणी आतमध्ये शिरल्याने कार पाण्यात बुडाली. यावेळी पुढच्या बाजूच्या दो्नही खिडक्या उघड्या असल्याने योगेश आणि त्यांचा मुलगा हे दोघेही पाण्याबाहेर पडले. पण मागील दरवाजाची काच बंद असल्याने समृद्धी यांना बाहेर पडता आलं नाही.
मोठा आवाज झाल्याने शेजारील हॉटेलमधील वैभव जागडे, अक्षय जागडे, आदित्य लोणारे, तर धरणात मासे पकडणारे नामदेव काटकर हे सर्वजण धावत घटनास्थळी पोहोचले. हॉटेलमधील दोरी घेऊन वैभव जागडे याने पाण्यात उडी मारली. त्याने गाडीच्या टायरला दोरी बांधली आणि ती झाडाला बांधली, त्यामुळे कारने तळ गाठला नाही. त्यांनी पुढच्या खिडकीतून समृद्धी यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झाले नाही. वैभवने कारच्या जॅकनं मागच्या बाजूच्या खिडकीची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढले.
त्यानंतर गणेश फाळके यांच्या कारमधून समृद्धी यांना पानशेत येथील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मुत्यु झाला होता.स्थानिक तरुण आदित्य लोणारे, गणेश फाळके, तुषार जागडे ,नामदेव काटकर आदींनी समृद्धी यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.पानशेत पोलिस चौकीचे अजय साळुंखे, राजाराम होले ,योगेश गरुड यांच्या पथकाने दवाखान्यात धाव घेतली.समृध्दी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला.
कारचा टायर फुटल्याने गाडी रस्त्यावरून घसरत जाऊन पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली, अशी माहिती वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले.त्यानंतर, गावातील गणेश फाळके यांच्या कारमधून त्यांना तातडीने पानशेत येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच समृद्धी यांचा मृत्यू झाला होता.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!