खळबळजनक ! कोयत्याचे वार करुन पुतण्याकडून चुलतीचा खून
उमदी : जत तालुक्यातील उमदी येथील वृद्धेचा तिच्याच पुतण्याने कर्नाटकात कोलार येथे नेऊन कोयत्याने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. खुनाची घटना गुरुवारी (ता. १२) घडली.
सुशीलाबाई राजाराम माने (वय ७४, रा. उमदी, ता. जत) असं मृत महिलेचं नाव आहे. संशयित पुतण्या दादासाहेब माने हा फरारी होता. त्यास उमदी पोलिसांनी सापळा रचून पकडून अटक केली आहे. त्याला २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सुशीलाबाई माने यांना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुतण्या दादासाहेब माने हा भाड्याच्या कारने विजापूर येथे घेऊन गेला होता. दादासाहेब याने विजापुरात एक कोयता विकत घेतला. पुढे कोलार येथे उतरून सुशीलाबाई यांना पाहुण्यांच्या घरी सोडून येतो, असं सांगून कार चालकाला थांबवून तो गेला. त्यानंतर दोन तासांनी तो एकटाच आला. सुशीलाबाई यांना पाहुण्यांच्या घरी सोडून आलो, असे त्याने चालकाला सांगितले. मात्र, त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग पडल्याचे दिसून आल्याने त्याला संशय आला. त्याने परत आल्यावर आपल्या मित्रांना ही माहिती दिली. त्यांनी चडचण येथील पोलिसांना याबाबत कळवले.
दरम्यान, सुशीलाबाई यांच्या जत येथील जावयाने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार उमदी पोलिस ठाण्यात दिली होती. उमदी पोलिसांनी तपास सुरू केला. मोटारचालकाला बोलावून घेऊन चौकशी केली. त्यानंतर शनिवारी कर्नाटकातील कोलार येथे जाऊन शोध घेतला असता, सुशीलाबाई माने यांचा मृतदेह उसाच्या फडात सापडला. त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे दिसून आले. संशयित दादासाहेब माने हा फरार झाला होता. त्यास कर्नाटकातून ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना तत्काळ सहकार्य न मिळाल्याने उमदी पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विलंब झाल्याचे सांगण्यात आले. तपास सहायक पोलिस दत्तात्रय कोळेकर, श्रीशैल वळसंग, नितीन पलुस्कर करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!