पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीचा विहिरीत पडल्याने मृत्यू, पुण्यात खळबळ
पुणे : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील गणेशवाडीमधून १९ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री घडली. बिबट्या मागे लागल्याने ही तरुणी विहिरीत पडल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.सध्या तरी पोलिसांनी तिचा मृत्यू कशामुळे झाला आहे याचा अंदाज व्यक्त केला नाही.
शुभांगी संजय भालेराव (वय १९) असे विहिरीमध्ये पडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशवाडी येथील शेतकरी संजय खंडू भालेराव हे सोमवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. तर त्यांची पत्नी निरगुडसर येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेली होती. सकाळची साडेनऊ वाजता बबन भालेराव यांच्या सार्वजनिक हिस्सा असलेल्या विहिरीतून शेती पंपाद्वारे चालू असलेले पाणी बंद करण्यासाठी शुभांगी गेली होती. त्यानंतर काही वेळानंतर शुभांगी कोणालाही दिसली नाही. त्यामुळे ती मंचर येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीला गेली असावी असा समज झाला. दुपार झाल्याने शुभांगीचा भाऊ शुभमने गावातील स्वप्निल खंडागळे याला शुभांगी अकॅडमीला आली का? असे विचारले असता स्वप्नीलने सांगितले की, ती आज आली नाही शेजारी वहिनीकडे गेली असावी हे समजून ती बराच वेळ वाट पाहूनही घरी आली नाही.
त्याने तिचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायंकाळी स्वप्निल खंडागळे आणि तेथील शेजारी नातेवाईक आणि शुभांगी चा धाकटाभाऊ शुभम यांनी विहिरीकडे जाऊन पाहिले असता विहिरीला पाणी भरपूर असल्याने अंदाज येत नव्हता. अखेर शेवटी गळ टाकून पाहिले असता गळाला काहीतरी जड लागते असे समजून त्यांनी गळ अधिकच खोलवर सोडला. त्याद्वारे शुभांगीचे कपडे गळाला लागले.
त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी शुभांगीला विहिरी बाहेर काढले असता ती मृत झाल्याचे दिसून आले. परंतु, तिच्या चेहऱ्यावर, कानाच्या मागे, मानेजवळ आणि हाताच्या दंडाचे लोचके तोडलेले दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शुभांगीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले. ती जीव वाचवण्यासाठी विहिरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, किंवा विजेचा शॉक बसून ती विहिरीत पडली असावी असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या घटनेचा तपास मंचर वनविभाग अधिकारी करीत आहेत. शुभांगी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात विहिरीत पडून शुभांगी संजय भालेराव या तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तर वनखात्याने तपासानंतर मृत्यूचे मूळ कारण पुढे येईल असे सांगितले आहे. घटनास्थळी मंचर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच कळंब येथील माजी सभापती वसंतराव भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, उद्योजक नितीन भालेराव यांच्यासह वाडीवस्तीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!