पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड, भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष ताब्यात

पिंपरी चिंचवड :भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट महापालिका भवनातील स्थायी समिती कक्षात छापा टाकल्याने सगळेच हादरले.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला असल्याने मोठी खळबळ उडालीये.

9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात घेण्यात आले आहे तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना आता पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक होती. ही बैठक दुपारी सुरु झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या कार्यालयावर धाड टाकली. एसीबीने अचानकपणे टाकलेल्या या धाडीमुळे पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर एकच खळबळ उडाली. संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तीन पुरुष आणि एक महिला अधिकारी अचानकपणे स्थायी समिती कार्यालयात दाखल झाले. स्थायी समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या कार्यालयाता ताबा या अधिकाऱ्यांनी घेतला.

9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात थेट पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचं नाव आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय अरविंद कांबळे, राजेंद्र शिंदे या लिपिकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. 9 लाख लाच प्रकरणात तब्बल 2 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे. टेंडर मंजुरीनंतर वर्क ऑर्डर काढण्याकरिता ही लाच घेण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे.स्थायी समितीचे चेअरमन नितीन लांडगे यांच्या घरी जाऊन लाचालुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली.

स्थायी समितीचं कार्यालयही बंद

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीचं कार्यालयही बंद केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईवेळी दोन ठेकेदार स्थायी समितीच्या कार्यालयातच अडकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्थायी समितीची बैठक असल्यामुळे महापालिका परिसरात आज मोठी गर्दी होती.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.