पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर ‘एसीबी’चा छापा, स्वीय सहाय्यक जाळ्यात

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर आज (गुरुवारी) ‘एसीबी’ची धाड पडली आहे. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर धाड पडली आहे. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभा संपल्यानंतर पाचच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. स्थायी समिती अध्यक्षाचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर आणले.महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षामध्ये लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे.

पिंपरी चिंचवड मधील महापालिका भवनात सायंकाळी साडेचार वाजता महापालिका पार्किंगमध्ये स्थायी समितीचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना एका कंत्राटदाराकडून २ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर एसीबी पथकाने पिंगळे यांना ताब्यात घेतले आहे. दालन बंद करून घेत त्यांची चौकशी सुरू आहे आहे.

भाजापाची सत्ता असलेल्या महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार होत असल्याच्या बातम्या वारंवार छापून येतात. त्याच्या आधारावर लाचलुचपत विभागाने आज दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यानंतर छापा टाकला. समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.