पिस्तूल खरेदी करण्यासाठी फोडले एटीएम; एकास अटक

पिंपरी चिंचवड : परिसरात एकमेकांकडे पाहण्यातून झालेल्या वादातून मारहाण झाली होती. या रागातून मुलाचा गेम वाजवण्यासाठी पिस्टल खरेदीसाठी एटीएम फोडण्याऱ्या तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेज तपासले.

विशाल दत्तु कांबळे (वय-24 रा. संगमनगर, नॅशनल स्कुल गेट नं.20, रेल्वे लेन, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,जुनी सांगवीतील लक्ष्मीनगरमधील लेन क्रमांक एक येथे अक्सीस बँकेचे एटीएम सेंटर असून सोमवारी (ता.१६) मध्यरात्री एकच्या सुमारास चोरटा एटीएम सेंटरमध्ये शिरला. मशीनचे स्क्रीन, पत्र्याचे कव्हर, कॅश वे च्या खालील डायलरच्या बाहेरील आवरणाचा पत्रा उचकटला. त्यानंतर डायलरच्या एका बाजूला ठोसे मारून डायलर तोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम सेंटरच्या मुख्य दरवाजाची व त्याबाजूची काच फोडून चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने गुन्हा घडलेल्या परिसरातील 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.त्यानुसार आरोपी संगमनगर येथील असल्याचे समजले. सापळा रचून, पाठलाग करून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी ‘दारू कोठे मिळेल असे विचारले असता त्याने जवळच्या परिसरात मिळेल असे सांगितले. तेव्हा त्यास दारू पिण्यास सोबत जाऊ असे सांगत विश्वासात घेऊन त्याच्याकडे घडल्या प्रकाराबाबत अधिक चौकशी केली. त्यानंतर आरोपीने सर्व माहिती दिली.

आरोपी विशाल कांबळे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले,मागील आठवड्यात सांगवी परिसरामध्ये ऐकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन एका मुलाने मारहाण केली होती. त्याचा राग मनामध्ये होता. त्याचा बदला घेण्यासाठी मारहाण करणाऱ्या मुलाचा गेम वाजविण्यकरीता पिस्तुलाची आवश्यकता होती. पिस्तुल खरेदीसाठी एटीएम फोडून पेसे मिळतील असा प्लॅन केला होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अमंलदार राजेश कौशल्ये, उमेश पुलगम, सागर शेडगे, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, प्रविण कांबळे, प्रविण माने, आशिष बनकर, नितीन लोखंडे, गणेश कोकणे व चिंतामण सुपे यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.