तलवारीने वार करत एका कुटुंबातील चौघांवर खुनी हल्ला, तिघांना अटक

पिंपरी चिंचवड : तलवारीने वार करत एका कुटुंबातील चौघांवर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 17) रात्री साडेनऊ वाजता सिद्धेगव्हाण, ता खेड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

कमल चंद्रकांत पवार (वय 41, रा. सिद्धेगव्हाण, ता. खेड), त्यांचे पती चंद्रकांत पवार, मुलगा प्रतीक पवार, मुलगा चैतन्य पवार अशी जखमींची नावे असून कमल पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार नामदेव उर्फ प्रमोद संजय भैरवकर, संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर (सर्व रा. सिद्धेगव्हाण, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी लघुशंकेसाठी गेल्या. फिर्यादी यांचे बाथरूम आरोपीच्या घराजवळ असल्याने त्या तिकडे लघुशंकेसाठी गेल्या. त्यावेळी आरोपी संजय हा घरासमोर उभा होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ‘बायामाणसे लघवी करताना पण बाहेर थांबतात’ असे म्हणाल्या. त्यावरून आरोपींनी जोरजोरात शिवीगाळ केली.

त्याबाबत फिर्यादी यांचे पती समजावून सांगत असताना आरोपी नामदेव याने तलवारीने त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या दोन्ही मुलांवर आणि फिर्यादी यांच्यावर तलवारीने वार करत खुनी हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.