नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू
नाशिक : शहरातील डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक घटनेनं नाशिक शहर हादरून गेलंय. कॉलेज मधील हॉस्टेलमध्ये MD च्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. डॉ स्वप्नील महारुद्र शिंदे असं या डॉक्टरचं नाव आहे. तो गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मेडिकल कॉलेजच्या वॉशरूममध्ये त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बीडमधील स्वप्नील शिंदे शिक्षणासाठी पवार मेडिकल कॉलेजमध्ये आला होता. मात्र सिनिअरच्या त्रासाला तो बळी ठरला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
डॉ स्वप्नील महारुद्र शिंदे हा कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून 2018ला MBBS झाला. अत्यंत हुशार असलेल्या स्वप्नीलनं चक्क गोल्ड मेडल मिळवलं. आपल्या MBBS शिक्षणासाठीही स्वप्नीलला, सरकारी कोट्यातून मेरिटवर ऍडमिशन मिळाली होती. आपल्या अभ्यासू गुणांनी स्वप्नील हा विद्यार्थ्यांत लोकप्रिय होता मात्र त्याच्या याच हुषारीचा काहींना अतोनात राग होता. नाशिकला तेच झालं आणि त्याच्या सिनिअर असलेल्या 2 विद्यार्थिनींनी त्याचा छळ सुरू केल्याचा आरोप त्याचे वडील महारुद्र शिंदे यांनी केला आहे
कॉलेज प्रशासनानं मात्र रॅगिंगचे आरोप फेटाळून लावलेत. स्वप्नीलची मानसिक अवस्था ठीक नव्हती. त्याच्यावर वर्षभरापासून उपचार सुरू होते असं कॉलेज प्रशासनाचं म्हणणं आहे. स्वप्नीलच्या संशयास्पद मृत्यूनं पोलिसही चक्रावलेत. रॅगिंगनेच स्वप्नीलचा बळी घेतला का? घातपातामुळेच त्याला जीव गमवावा लागला का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्य़ाचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
सहा महिन्यांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न
स्वप्नील याने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा उघडकीस आला आहे. इतकेच नाहीतर आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली होती ज्यामध्ये दोन मुलींची नावे लिहिण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!