पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू

पुणे : पोलीस आयुक्तालयात चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या एकाने स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली होती. संबंधीत तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप करत तो पोलीस यंत्रणेचा बळी ठरल्याचे म्हटले आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (42,रा.खडकी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सुरेश विठ्ठल पिंगळे हे कुटुंबीयांसह खडकीतील आंबेडकर चौकात राहायला आहे. त्यांना खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरी मिळाली होती. त्यासाठी त्यांनी एक जुलैला चारित्र्य पडताळणीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, पत्ता चुकीचा असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करून नव्याने सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. दरम्यान, २२ जुलैला नाम साध्यर्मामुळे समर्थ, कोथरूड, सहकारनगर पोलिस ठाण्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे संगणक प्रणातील दिसून आले. त्यानंतर पुन्हा त्यांचा अर्ज ‘व्हेरिफिकेन’साठी पाठविण्यात आला. २७ जुलैला तक्रारींचे निवारण करून अर्ज स्वीकारण्यात आला होता

चारित्र्य पडताळणीचा दाखला मिळविण्यासाठी पिंगळे बुधवारी पोलिस आयुक्तलयाच्या परिसरातील तक्रार निवारण खिडकीजवळ आले होते. त्याठिकाणी त्यांच्या शंकेचे निराकरण झाले नाही. त्यामुळे विमनस्क अवस्थेत त्यांनी हाताची नस कापून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पेट घेतलेल्या अवस्थेतच पोलीस आयुक्तलयाचे कार्यालयात पळत गुन्हे शाखेच्या इमारतीकडे गेला. गेटवरील बंदोबस्तावरील कर्मचारी व गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्याच्या मागे धावत गेले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्नीशामक दलाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले . भाजलेल्या अवस्थेत पिंगळेला ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यानंतर त्याच्यावर सुर्या हॉस्पिलमध्ये उपचार करण्यात येत होते. तो 90 टक्के भाजला असल्याचे रुग्णालयाने सांगितले होते.

दरम्यान, बुधवारी पोलिसांना त्याच्या बॅगेत काही कागदपत्रे सापडली होती. यामध्ये एक सुसाईड नोटसही होती. यामध्ये त्याने पोलीस यंत्रणेच्या त्रासाबरोबरच घरगुती आणी काही मित्रांकडून होणाऱ्या त्रासा बद्दल लिहले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच्या पत्नीने बंडगार्डन पोलिसांना एक अर्ज दिला आहे. त्यामध्ये पोलिसांनी तो व्यवस्थित शुध्दीवर असताना जबाबाची नोंद केली नाही. तसेच मागील दोन महिण्यात चारित्र्यपडताळणीसाठी होत असलेल्या त्रासाला कंटाळ्याने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचीही नावे घेतली गेली आहेत.

मृतदेह ताब्यात घेणार नाही, पिंगळे यांच्या कुटुंबियांची भूमिका

या घटनेनंतर पिंगळे यांचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून जोपर्यंत आपल्या जबाबादारीची हमी देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पिंगळे यांच्या पत्नीने घेतली आहे. या घटनेनंतर पिंगळे यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

“मला न्याय हवाय. माझ्या मुलांचं मी काय करु. मला नोकरी नाही. एकतर मला नोकरीला लावावं. मला नोकरी लागली तर मुलांचं पोट भरेल. कारण नोकरीसाठीच त्यांनी आत्मदहन केलं आहे. पोलीस अधिकारी याबाबत लेखी स्वरुपात सांगत असतील आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ”, असं पिंगळे यांच्या पत्नीने सांगितलं.

पोलिसांची नेमकी भूमिका काय?

या प्रकरणावर पोलिसांनी याआधीच भूमिका स्पष्ट केली आहे. सुरेश पिंगळे नावावर तीन गुन्हे दाखल होते. त्यापैकी दोन गुन्हे हे दुसऱ्या व्यक्तीवर दाखल असल्याची नंतर माहिती मिळाली होती. तर तिसऱ्या गुन्ह्या संदर्भातही तपास सुरु होता. त्याचा अहवाल आल्यानंतर व्हेरिफिकेशन देण्यात येणार होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

बुधवारी पोलीस आयुक्तालयात थरार

सुरेश पिंगळे बुधवारी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आले होते. त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हवं होतं. पण कदाचित त्यांना वेळेवर ते प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी संतापात टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं. इतकंच नाही तर त्या पेटत्या अंगाने त्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली. हा सर्व थरार उपस्थित लोक पाहात होते. त्याचवेळी काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पेटत्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचं धाडस काहींना करता आलं नाही. पण काहींनी ते धाडस करुन, आग विझवली. त्यानंतर सुरेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दोन दिवसांच्या उपचारानंतरही सुरेश यांची प्राणज्योत मालवली. या सर्व थरारानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.