पिंपरी-चिंचवड महापालिका लाच प्रकरण ! ‘ते’ सोळा जण कोण? आजच्या न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांची पोलिस कोठडी सोमवारी (ता. २३) संपत आहे. त्यामुळे त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै वर सोळा जणांना द्यावे लागतात असे सांगितले होते.  मात्र, तपासात त्याने काहीही सांगितले नाही, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी न्यायालयात दिली होती. गेल्या दोन दिवसांत त्याने माहिती दिली असल्यास ‘ते’ सोळा जण कोण? याकडे सर्वांचे लक्ष असून, सोमवारच्या सुनावणीकडेही ‘नजर’ आहे.

ठेकेदाराकडून एक लाख १८ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, स्वीय सहायक ज्ञानेश्‍वर पिंगळे, लिपिक विजय चावरिया, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांना अटक झाली आहे. त्यांची पोलिस कोठडी सोमवारी संपत आहे. मात्र, पैसे कोणाला द्यावे लागतात, या बाबत त्यांनी शनिवारपर्यंत पोलिसांना माहिती दिली नव्हती. दरम्यान, स्वीय सहायकासह चारही कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेतून निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या जागेमध्ये होर्डींग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या 28 निविदा मंजुर झालेल्या होत्या. परंतु त्यांची वर्कऑर्डर न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले. तेव्हा, वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी च्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या 28 निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाऊंट) 3 टक्के रक्कम म्हणजे 10 लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 2 टक्केप्रमाणे सहा लाख रूपये घेण्याचे मान्य झाले. 6 लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता २ टक्क्याप्रमाणे 1 लाख 18 हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक – विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई, अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्वीकारल्यावर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.