केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक
रत्नागिरी :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. त्याआधी नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नारायण राणे यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. त्यापूर्वी नारायण राणे यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या नंतर आता शिवसेना विरुध्द पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरु होणार आहे.
नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. कालच्या राणे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नारायण राणेंना अटक झाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपच्या वतीनं देण्यात आला होता. नारायण राणेंच्या अटकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या पद्धतीने सरकारकडून पोलिसांचा गैरवापर सुरु आहे ते पाहता आम्ही राणे साहेबांच्या मागे संपूर्ण पक्ष म्हणून भक्कमपणे उभे आहोत असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले
काय आहे प्रकार?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने युवासेनेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती
राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!