केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता…
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून पुण्यातील शिवसैनिक रोहित कदम यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राणे यांच्यावर कलम 153 आणि 505 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे.
नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!