संध्या सूर्यवंशी ठरली ‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ची महाविजेती
पिंपरी चिंचवड : ‘केअर ऑफ यू’ या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच पिंपरी येथे पार पडली. यामध्ये संध्या सूर्यवंशी स्पर्धेची महाविजेती ठरली. ही स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या सभागृहात “हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार” स्पर्धेचा महाअंतिम फेरीचा सोहळा रंगला. या महाअंतिम फेरीसाठी प्रशिक्षक म्हणून सुप्रसिध्द गायिaका वैशाली सामंत, सुप्रसिद्ध गायक शादाब फरिदी आणि अल्तमाश फरिदी लाभले. महाअंतिम सोहळा सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महिला व बाल विकासचे आयुक्त राहूल मोरे, केअर फॉर यु संस्थेचे सी. ए. पायल सारडा राठी, सी. ए. रोशन राठी, संतोष बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
केअर फॉर यु एनजीओ मागील 12 वर्षांपासून महाराष्ट्रातील अनाथाश्रम व वृध्दाश्रम यांच्याकरिता विविध माध्यमातून काम करीत आहे. अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद भरण्याचे हेतूने केअर ऑफ यु संस्थेने “इंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार” या महाराष्ट्रातील पहिल्या रिअॅलिटी शोची संकल्पना मांडली. ज्यामध्ये फक्त अनाथाश्रमातील मुले सहभागी होतील आणि इतर प्रसिध्द रिअॅलिटी शोप्रमाणे या अनाथ मुलांना त्यांच्यातील कलागुण जगासमोर मांडता येतील.
केअर ऑफ यु संस्थेला हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टारच्या आयोजनास पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आणि सिलव्हर ग्रुप यांचे सहकार्य लाभले. जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातील 5 प्रमुख केंद्रावर या स्पर्धेच्या ऑडिशन संपन्न झाल्या. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध शहरातील अनाथाश्रमातून शेकडो मुले सहभागी झाली. पहिल्या फेरीत त्यापैकी 47 गायकांची निवड झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतुन 12 गायक महाअंतिम फेरीसाठी निवडले गेले. या 12 गायकांना ऑनलाईन माध्यमातून पाच महिने प्रशिक्षण देण्यात आले. तसेच महाअंतिम सोहळ्याच्या पाच दिवस अधिपासून महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या या मुलांची निवास, प्रशिक्षण व सरावाची व्यवस्था पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आली होती.
अनाथ मुलांचे कलागुण जगासमोर आणण्यासाठी केअर ऑफ यु संस्था सदैव कार्यरत राहील. तसेच केअर फॉर यु संस्थेच्या स्थापनेपासून मागील बारा वर्षांत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मार्गदर्शक म्हणून महत्वपूर्ण भुमिका बजावलेली आहे, असे संस्थेच्या संस्थापिका पायल सारडा राठी यांनी सांगितले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!