पिंपरी चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 2 जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : अजंठानगर चिंचवड येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे.नगदी रकमेसह जुगाराचे साहित्य आणि मोबाईल फोन असा एकूण आठ हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरूध्द निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) दुपारी करण्यात आली.
प्रतीक त्रिंबक गायकवाड (वय 20), विजय गरड (दोघे रा. अजंठानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक कंठय्या स्वामी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजंठानगर मधील समता बिल्डिंगच्या समोर पिंपळाच्या झाडाखाली कल्याण मटका नावाचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कारवाई केली असता आरोपी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत पाच हजार 580 रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल फोन असा एकूण आठ हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना सीआरपीसी 41 (अ) (1) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!