मोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात दरोडेखोराला अटक, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नारायणगाव : मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेला व मागील चार वर्षा पासून फरार असलेला पारनेर तालुक्यातील कुख्यात दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले ( वय ४५ रा. निघोज,ता पारनेर, जि. अ. नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.  याच्या अटकेने खून, दरोडे व जबरीचोरीचे गुन्हे उघड होण्यास मदत होणार आहे.

जुन्नर व शिरूर तालुक्यात दरोडे टाकून कुटुंबातील सदस्यांना जबरी मारहाण करून बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले याच्यासह त्याच्या टोळीतील पाच ते सात जण मागील चार वर्षा पासून फरार आहेत. आरोपी सतत ठिकाण बदलून जंगल व डोंगराळ भागात वास्तव्यास असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड होते. दोन्ही गुन्ह्यांत आरोपींवर मोक्का ( संघटित गुन्हेगारी) कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती. बाळू भोसले याने सहकऱ्यांच्या मदतीने सन २०१७ मध्ये शिरूर पोलीस स्टेशनहद्दीत तर १४ डिसेंबर २०२० रोजी आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील मंगरूळ येथे दरोडा टाकून रोख रक्कम व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.त्या नुसार वेषांतर करून पोलीस आरोपींच्या मागावर होते. बाळू भोसले हा बेल्हे येथे अळकुटी फाट्यावर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या नुसार मंगळवारी(ता.२४) बाळू भोसले याला अळकुटी फाट्यावर सापळा लावून सिनेस्टाईल पटलाग करून पोलिसांनी अटक केली.

आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील तपासाकरीता आळेफाटा पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, हवालदार दिपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.