रोजच्या भांडणाला कंटाळून सराईत गुन्हेगार असलेल्या भाच्याच्या मदतीने सुनेने काढला सासूचा काटा, पुण्यातील धक्कादायक घटना

पिंपरी चिंचवड : सासू सुनेचं भांडण दैनंदिन रोजच कानावर पडत असतं मात्र रोजच्या भांडणाला कंटाळून चक्क सराईत गुन्हेगार असलेल्या भाच्याच्या मदतीने सासूचाच काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 14 जुलै रोजी पुण्यातील येरवडा  परिसरात 70 वर्षीय वृद्ध महिला हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती, परंतु घटनेच्या जवळपास एक महिन्याच्या अंतरानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरवलेल्या महिलेची हत्या झाल्याचं समोर आलंय. या हत्येत खुद्द तिच्याच सुनेचा हात असल्याचं स्पष्ट झाले आहे.खून केल्यानंतर सासूचा मृतदेह देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला टाकून दिला.याप्रकरणाची गुन्हे शाखा युनिट दोनने उकल केली.असून सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरोजाबाई दासा जोगदंड (वय 70, रा. येरवडा पुणे) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. याप्रकरणी इम्तियाज ऊर्फ चिंट्या मुस्ताक शेख (वय २५, रा.ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मुन्नी गेना जोगदंड असे आरोपी मावशीचे नाव आहे..दोघांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत सरोजाबाई यांची मुलगी लतिका वसंत गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्नी हिने मृत सासूच्या मुलासोबत आंतरजातीय विवाह केला होता. तिच्या पतीचा मागील काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यानंतर सासूआरोपी सुनेला त्रास देत होती. मयताने पाच एकर जमीन विकली असून त्यातून तिला खूप पैसे मिळाले असल्याचे सुनेला समजले होते. चिंट्या याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाला असून दुसऱ्या खुनाच्या गुन्ह्यात तो पॅरोलवर बाहेर आला होता. चिंट्या कारागृहातून बाहेर आल्यानंतर मुन्नीने चिंट्याला सांगितले की, सासू खूप त्रास देत असून तिला मारण्यासाठी तू येरवड्याला ये’. त्यानुसार चिंट्याने निगडीमधून एक रिक्षा चोरली आणि मावशी मुन्नीकडे
गेला. दोघांनी मिळून मुन्नीच्या सासूला ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह रिक्षात घालून तिला जुना पुणे- मुंबई महामार्गाच्या बाजूला देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकले.

सुरुवातीला सरोजाबाई यांच्या मिसिंगची तक्रार त्यांच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, चिंट्या याने सरोजाबाई यांचा खून केला असून तो ओटास्किम परिसरात आहे. त्यानुसार पोलिसांनी चिंट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या मुन्नी मावशीने मिळून हा खून केल्याचे कबूल केले. आरोपी चिंट्याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपीने हत्या करून टाकलेला मृतदेह पोलिसांनी पंचासमक्ष ताब्यात घेतला असून हत्येतील आरोपी शेखच्या युनिट दोनच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तर या खून प्रकरणातील आरोपी सून मुन्नी जोगदंड ही सध्या फरार असून पोलीस तिच्या मागावर असून लवकरच तिला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

पोलिसांनी चिंट्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 40 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार जमीर तांबोळी, प्रमोद येताळ, विपुल जाधव, जयवंत राऊत, नामदेव राऊत, दिलीप चौधरी, केराप्पा माने, शिवानंद स्वामी, अजित सानप यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.