पिंपरी-चिंचवड महापालिका लाच प्रकरण ! अॅड. नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला ; येरवडा कारागृहात रवानगी
पिंपरी चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्या प्रकरणात तात्पुरत्या जामिनीवर सुटलेले पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचा जामीन कायम करायला विशेष न्यायालयाने नकार दिला.
आज्जीचे (आईची आई) निधन झाल्याने तिच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमास जायचे आहे, असे कारण सांगून लांडगे यांनी अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करीत 26 आॅगस्टपर्यंत जामीन देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मात्र, ताराबाई बोऱ्हाडे या लांडगे यांच्या वडिलांची मावशी असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती देऊन तात्पुरता जामीन मिळावल्याचे दिसून येत असल्याचे ‘एसीबी’ पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने लांडगे यांना जामीन देण्यास नकार देत न्यायालयीन कोठवडी सुनावली.
वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी (दि.18) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.19) पहाटे अटक केली. न्यायालयाने आरोपींना 21 ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यानंतर पुन्हा 23 ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 23 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना गुरुवार (दि.26) पर्यंत तात्पुरता जामीन दिला होता. जामिनीची मुदत संपल्याने लांडगे आज शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर झाले. त्यांचा जामीन कायम करायला एसीबी पोलिसांनी विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून लांडगे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
तक्रारदार हे जाहिरात ठेकेदार आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेडील 26 वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा भरल्या होत्या. 2019 व 2020 च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क आॅर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याच्याशी संपर्क केला. त्याने बोली रकमेच्या तीन टक्के रक्कमेनुसार १० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रुपयांचे देण्याचे ठरले. त्यातील एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटककारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.
अॅन्टी करप्शनचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,
अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा
यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!