मुलगी झाल्याने सासरच्य़ांनी केला छळ, सूनेने घेतला गळफास

पुणे : दोन्ही वेळेला मुली झाल्याने सासरच्य़ांनी सूनेचा छळ करायला सुरुवात केली. अखेर सततच्या छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चतुःशृंगी परिसरातील संभाजी हौसिंग सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी पती अमोल जाधवसह सासरच्यांविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरती अमोल जाधव (वय 27) असे त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरती यांची आई मंदा दिलीप कुशाळकर (वय-48 रा. आस्था सहवास, रश्मी स्टारसिटी बिल्डींग समोर, नालासोपारा (ई) पालघर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अमोल अशोक जाधव, सासु वंदना अशोक जाधव, सासरे अशोक जाधव, नणंद कल्याणी अभिजीत जगताप (सर्व रा. 6/24, संभाजी हौसिंग सोसायटी, भारतीय विद्या भवन शाळेमागे) यांच्या विरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आणि आरती यांचे जून 2012 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर आरती सासरी नांदत असताना तिचा पती आणि नातेवाईक तिचा छळ करत होते. आरतीला दोन्ही वेळेला मुलीच झाल्याचा राग सासरच्यांना होता. सिझरमुळे आमचा पैसा वाया गेला. तुला मुलगा होत नाही. चपात्या करता येत नाही. तू घरात काम करीत नाही, असे बोलून सासरच्यांनी तिचा मानसिक छळ सुरु केला होता. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आरतीने 7 जूनला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एल. एस. उकिर्डे अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.