फरार असताना रवींद्र बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्या वकिलाला अटक
पुणे : मोक्कासारख्या गंभीर गुन्हयात फरारी असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र ब-हाटे याला फरार असताना आश्रय देणाऱ्या वकिलाला पोलिसांनी अटक केली. याच वकिलाच्या घरातून पोलिसांना आव्हान देणारे व्हिडिओ ब-हाटे याने सोशल मीडियावरून व्हायरल केले होते. मात्र शोध घेऊनही वकील पोलिसांना सापडत नव्हता. राज्यभर पोलीस शोध घेत असताना पुण्याजवळच तो अधिक काळ लपून बसला होता, अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
सागर संजय म्हस्के ( वय 32 रा.म्हस्के वस्ती, कळस आळंदी रस्ता) असे अ़टक केलेल्या वकिलाचे नाव आहे. एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या रविंद्र ब-हाटेला फरार मुदतीत रूमवर राहाण्यास आश्रय दिल्याप्रकरणी मस्के याला अटक करण्यात आली आहे.
रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांवर जबरदस्तीने रो हाऊस बळकावणे, व्याजाने पैसे देऊन जातीवाचक शिवीगाळ करत धमकावणे, ठार मारण्याची धमकी देणे याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात माहीती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि टोळीवर मोक्काची कारवाई केली होती. मात्र, कारवाईनंतर बऱ्हाटे पसार होता. गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी बऱ्हाटेला अटक केली. त्यानंतर बऱ्हाटे हा आळंदी रोडवर असलेल्या सागर म्हस्के याच्या घरीच राहत असल्याचे समोर आले होते.
पण, तो याप्रकरणी नाव समोर आल्यानंतर पसार झाला होता. त्याचा शोध घेतला जात होता. त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!