घटस्फोटित पत्नीवर चाकूने वार करुन खुन करण्याचा प्रयत्न ; पुण्यातील वडगावशेरी येथील घटना
पुणे :आपण दिलेले पैसे परत मागणार्या घटस्फोटित पत्नीवर चाकून वार करुन तिचा खुन करण्याचा प्रयत्न केला. हि घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता वडगाव शेरीतील गवळीवाडा येथे घडली.
सनी बाळु गायकवाड (वय 32, रा.झेड कार्नर, केशवनगर मुंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून त्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी सनी गायकवाडचा 2011 धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता.त्यानंतर 2017 मध्ये काही कारणास्तव ते विभक्त राहत होते, तर 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु, एकत्र राहत असलेल्या कालावधीत फिर्यादीने गायकवाडला काही पैसे दिले होते. त्यामुळे त्या त्याच्याकडे सातत्याने पैशांची मागणी करीत होत्या. गायकवाड याने शुक्रवारी दुपारी फिर्यादीस फोन केला.
“मी तुझ्या घरी येतो व तुझे काय असतील ते पैसे देऊन टाकतो’ असे सांगून त्याने फिर्यादीस तिच्या घराच्या खाली बोलावले. त्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये आल्या असताना सनी याने त्यांच्या डाव्या हातावर, दंडावर, छातीवर चाकूने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्या जखमी झाल्याचे पाहून तो पळून गेला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून चंदननगर पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विवेक सिसाळ करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!