चिंचवडमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी: 6 आरोपी ताब्यात; 3 किलो सदृष्य उलटी जप्त

पिंपरी चिंचवड : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. चिंचवड येथील पूर्णानगरमध्ये पुणे वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आले. आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आरोपींकडून व्हेल माशाची उलटी सदृष्य 3 किलो ग्रॅम पदार्थ आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

मुहमदनईन मुटतअली चौधरी (वय 58), योगेश्वर सुधाकर साखरे (वय 25, रा. बालेवाडी), अनिल दिलीप कामठे (वय 45, रा. फुरसुंगी), जोतिबा गोविंद जाधव (वय 38), कृष्णात श्रीपती खोत (वय 59) आणि सुजाता तानाजी जाधव (वय 44) असे अटक आरोपींची नावे आहेत.

पुणे वनविभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील पूर्णानगरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या वतीने याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून आरोपींना ताब्यात घेतले. वनजीवांची तस्करी व शिकार होत असल्यास हॅलो फॉरेस्टच्या 1926 या टोल फ्री क्रमांकार संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने कऱण्यात आले आहे.

व्हेल माशाची उलटीची एक किलोची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते.

अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.