गॅस एजन्सी व्यवस्थापकास ब्लॅकमेल करून खंडणीची मागितल्या प्रकरणी पत्रकार संघाच्या अध्यक्षासह 3 रिपोर्टरला अटक, प्रचंड खळबळ
पुणे :गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकास ब्लॅकमेल करून त्याच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या तीन कथित पत्रकारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. मार्केट यार्ड परिसरात शुक्रवारी (ता. 27) ही कारवाई करण्यात आली.
सम्यक संपादक पत्रकार संघाचा अध्यक्ष सुहास मारुती बनसोडे (वय 40, रा. कोंढवा), मोईन लाडलेसाहेब चौधरी (वय 45, रा. येरवडा) आणि वसिम अकबर शेख (वय 22, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत योगेश नवनाथ शिंदे (वय 31, रा. उरुळी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बनसोडे हा सम्यक संपादक पत्रकार संघ, महाराष्ट्रचा अध्यक्ष आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तक्रारदार शिंदे हे येरवडा-शांतीनगर भागात सम्यक इंडेन गॅस एजन्सीचे व्यवस्थापक आहेत. नागरिक तेथून त्यांच्या वाहनातून सिलिंडर नेतात. याचे व्हिडिओ चित्रीकरण मोईन व वसीम यांनी केले. त्यानंतर संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे शिंदे यांना दाखवून त्यांनी “गॅसची डिलिव्हरी घरपोच करायची असताना, तुम्ही ते करत नाहीत. तुमची एजन्सी बंद करण्याबाबतची तक्रार इंडियन ऑइलला दिली आहे. ती मागे घ्यायची असल्यास दोन लाख रुपये द्या. तसेच दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्या,’ असे म्हणत सम्यक संपादक पत्रकार संघ अध्यक्ष सुहास बनसोडे, चौधरी व शेख या तिघांनी खंडणी मागितली.
त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे (क्रमांक दोन) तक्रार अर्ज दिला. संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी मार्केटयार्ड प्रवेशद्वार 9 जवळ सापळा रचला. त्यानुसार तिघांना दोन लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!