बल्लुसिंग टाक टोळीविरुद्ध ‘मोक्का’नुसार कारवाई ; पुणे पोलिसांचे या वर्षातील मोक्का कारवाईचे अर्धशतक

पुणे : वानवडी परिसरातील बल्लुसिंग टाक याच्या टोळीविरुद्ध पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या  मार्गदर्शनाखाली ही 50 वी कारवाई आहे.

बल्लुसिंग प्रभुसिंग टाक, उजालासिंग पभूसिंग टाक (दोघेही रा. रामटेकडी), सोमनाथ नामदेव घारोळे (रा. म्हाडा वसाहत, हडपसर), पिल्लुसिंग कालुसिंग जुन्नी (रा.गोसावीवस्ती, हडपसर), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (रा.रामटेकडी, वानवडी), गोरखसिंग गागासिंग टाक (रा.बिराजदार वस्ती,हडपसर) असे कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,आरोपींनी 5 जुलैला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तवेरा गाडीमधून दरोडा टाकण्याच्या हत्यारासह येवून पंचरत्न सोसायटीमधील बंद फ्लॅटचे लॉक तोडून दरोडा टाकून पळून जात होते. यावेळी घटनास्थळी दाखल झालेले पोलीस अधिकारी अंमलदार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलीसांवर धारदार हत्याराने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला केला होता. त्यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान नमूद टोळीचा प्रमुख बल्लूसिंग टाक हा त्याचे इतर साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी चालवून सन 2008 पासून गंभीर स्वरूपाचे शरिराविरूध्द व मालमत्तेविरूध्दचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले. टोळीचा प्रमुख बल्लुसिंग टाक याने गुन्हे करताना वेगवेगळे साथीदार घेऊन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्याकरीता तसेच स्वतःचे व टोळीचे अवैध अर्थिक फायदयाकरीता दरोडयाची
तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगुन दहशत माजविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे चढत्या क्रमाने केले आहेत.

टोळी प्रमुख व त्याचे टोळीचे सदस्य यांना गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्याचे उद्देशाने त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच हद्दपारी सारखी ठोस कारवाई करून देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनात काहीएक चांगला परिणाम झाला नव्हता. त्यामुळे त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्‍यक होते. त्यामुळे त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध “मोका’ अंतर्गत कारवाई करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी तत्कालीन अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्यास मंजुरी दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या 11 महिन्यांच्या कारकीर्दीत “मोका’ अंतर्गत झालेली हि 50 वी कारवाई आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.