न विचारता पाणीपुरी आणल्यानं पती पत्नीमध्ये वाद ; पत्नीची विषारी औषध पिऊन आत्महत्या

पुणे: न विचारता पाणीपुरी आणल्यानं पती पत्नीमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्यानं पत्नीनं विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे.

प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय-23 रा. फ्लॅट नं.202, सिंहगड व्हिला, आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याप्रकरणी प्रतिक्षाचे वडील प्रकाश प्रभाकर पिसे (वय-55 रा. सरकारी दवाखान्यामागे, बीड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती गहिनीनाथ सरवदे (वय-33) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती गहिनीनाथ हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांचा विवाह 2019 मध्ये प्रतिक्षासोबत (मुळ रा. बीड) झाला होता. त्यांना एक मुलगा आहे.  गहिनीनाथ उच्चशिक्षित असून एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहे. लग्नानंतर गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांच्यात वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वीच गहिनीनाथ यांनी प्रतीक्षा यांना पुण्यात आणलं होतं. ते दोघे आंबेगाव पठार परिसरात वास्तव्यास होते.

दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ यांनी ऑफिसवरून घरी येताना पाणीपुरी पार्सल आणली होती. मला विचारता पाणीपुरी का आणली, असा सवाल करत प्रतीक्षा यांनी त्यावेळी केला. यातून दोघांमध्ये वाद झाला. प्रतीक्षा यांनी पाणीपुरी खाण्यास नकार दिला. त्यानंतर प्रतीक्षा यांनी गहिनीनाथ कामावर जाताना त्यांना डबा नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रतीक्षा यांनी विषारी औषध प्राशन केलं. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र, शनिवारी (दि.28) दुपारी तीनच्या सुमारास प्रतिक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.