मालकाची 68 पोती साखर चोरून तपासात पोलिसांना मदत करणारा दुकानातील कामगारच निघाला चोरटा
पिंपरी चिंचवड : दुकानातून साखरेची ६८ पोती चोरीला गेली होती. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव येथे शुक्रवारी (दि. २७) रात्री १० ते शनिवारी (दि. २८) सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस तपास करीत असताना दुकानातील कामगार पोलिसांना मदत करीत होता. मात्र, सायंकाळी उशिरा तपासात मदत करणारा कामगाराच चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कामगार चोरटा आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
नरेशकुमार बाबुलाल सारंग (वय २२, रा. नर्मदा गार्डनसमोर, पिंपळे गुरव) यांनी रविवारी (दि. २९) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जगदीश भागीरथराम बिष्णोई (वय २४, सध्या रा. बालाजी फर्निचर, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव) आणि मुकेश बाबुलाल बिष्णोई (वय १९, रा. दापोडी), अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 27) रात्री दहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी सारंग यांनी आपला (एम एच 14 / एच जी 9950) टेम्पो पिंपळे गुरव येथील नर्मदा गार्डनसमोरील मोकळ्या जागेत दुकानाजवळ पार्क केला होता. या टेम्पोत एक लाख 14 हजार 376 रुपये किंमतीची 68 साखरेची पोती होती. ही पोती चोरीस गेल्याने फिर्यादी सारंग यांनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधला. सारंग यांना आपल्या दुकानातील कामगार जगदीश याच्यावर संशय होता. मात्र, संशयित कामगार जगदीश हा पोलिसांना स्वतःहून पुढे येत तपासाकरिता मदत करीत होता.त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहण्यास सुरवात केली. या फुटेजमधून एका टेम्पोचा क्रमांक पोलिसांना मिळाला. त्यानुसार टेम्पोवाला आरोपी मुकेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. साखरेची पोती आरोपी जगदीश आणि आपण चोरल्याचे आरोपी मुकेश याने पोलिसांना सांगितले. आरोपी मुकेश याचा पिंपळे गुरव परिसरात पाण्याचे जार पुरविण्याचा आणि किराणा मालाचा व्यवसाय आहे. सहायक निरीक्षक सतीश कांबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!