पिंपरीत आणखी एक खून ; धारधार शस्त्राने वार करून महिलेचा खून

पिंपरी : निगडी, तळेगाव दाभाडे, बाणेर, चिखली, सूस, रावेत येथील खुनाच्या घटना ताज्या असतानाच धारधार शस्त्राने वार करून महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५) रात्री सव्वा नऊच्या सुमारास धावडेवस्ती, भोसरी येथे उघडकीस आली.

कलावती धोंडीबा सुरवार (३८, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आठ दिवसांत पाठोपाठ सात खुनाच्या घटना घडल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कलावती यांच्या पतीचे निधन झाले असून त्या मुलासह भोसरीतील धावडेवस्ती येथे राहत होत्या. दरम्यान, शनिवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात शिरून धारदार हत्याराने वार करीत त्यांचा खून केला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आठ दिवसांत पाठोपाठ सात खुनाच्या घटना

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या आठ दिवसातील ही सातवी खुनाची घटना आहे. त्यामुळे एकूणच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे. खुनाची ही मालिका थांबताना दिसत नाही. खुनाच्या सत्रामुळे शहर हादरले आहे.

जोपर्यंत शहरात भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या चार दिवसांत तब्बल सहा हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त केली जातेय. पण पोलिसांना या घटनांचं खरंच गांभीर्य आहे का? हा चिंतनाचा भाग आहे. कारण या घटनांवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अजब दावा केला आहे. जोपर्यंत भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. कृष्ण प्रकाश यांची दबंग पोलीस अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हत्येच्या घटना वाढलेल्या नाहीत, कमीच आहेत. खरंतर हत्या व्हायलाच नको, या मताचा मी आहे. नागरिकांच्या समोर भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकत नाही. आता झालेल्या हत्येच्या घटना या सामाजिक नाहीत. तसेच शहरात कामगार वस्त्या आणि कामगार भरपूर आहेत. अनलॉकनंतर परराज्यातील नागरीक शहरात आले. त्यांच्यात वाद होत असतात. यातून या घटना घडल्या. त्यामुळे समाजात भीती बाळण्याची गरज नाही. या घटना व्यक्तीश: आहेत, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

हत्येच्या घटना कायद्याच्या भीतीने संपत नाहीत. कायदा माहिती असेल तर भीती असते. रागात असल्यावर लोक मागचा-पुढचा विचार करत नाहीत. राग नसतो तेव्हा कायद्याची भीती वाटते, असं देखील कृष्णा प्रकाश म्हणाले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.