पुणे शहरातील दोन सराईत गुन्हेगारांवर “एमपीडीए’ अंतर्गत कारवाई ; वर्षभरात 41 सराईतांची येरवड्यात रवानगी

 

पुणे : गुन्हेगारी टोळ्या तयार करून खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे करीत नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत दोन गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार हे वारजे माळवाडी व भवानी पेठेतील असून त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 41 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखर रविंद्र खवळे (वय-20 रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे) आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख (वय-23 रा. 386 भवानी पेठ, चुडामन तालीम समोर, पुणे) अशी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

शेखर खवळे हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी परिसरात कोयता, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगा, गंभीर दुखापत, यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 8 गंभीर गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके  यांनी आरोपी शेखर खवळे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार बबन शेख आणि याने त्याच्या साथिदारांसह खडक, लष्कर ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत.
आरोपी शेख कोयता, चॉपर, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह परिसरात फिरत असताना त्याने खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, दुखापत, चोरी, दंगा, घरफोडी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 13 गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बिहरट यांनी शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना दिला होता.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन दोन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची करावाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 41 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.