एअर इंडियाची मालकी ‘टाटा’कडे, 68 वर्षांनंतर पुन्हा सांभाळणार जबाबदारी

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या मालकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. टाटा सन्सकडे 68 वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यात टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावत बाजी मारली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय पातळीवरून निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

दरम्यान, जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर 29 जुलै 1946 टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी भारत सरकारनं घेतली होती. 1953 मध्ये केंद्र सरकारनं एअर इंडिया कंपनी ताब्यात घेतलं. तिचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं.  आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी इंडियन एअरलाईन्स अशा दोन स्वतंत्र कंपन्या सरकारनं सुरू केल्या.

एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्सचं पुढे काय झालं?

बँकॉक, टोकियो, न्यूयॉर्क, सिंगापूरसारख्या मार्गांवर सेवा देणाऱ्या एअर इंडियाची कामगिरी गेल्या काही वर्षांपर्यंत चांगली होती. एअर इंडियाच्या ताफ्यात सुरुवातीला बी ७०७ सारखी अत्याधुनिक विमानं होती. त्यानंतर बी ७४७ आणि ए ३१० सारखी विमानं एअर इंडियानं खरेदी केली. तो काळ एअर इंडियाच्या भरभराटीचा होता.

सरकार का विकतंय एअर इंडिया? 

सरकारनं संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं होतं की, आर्थिक वर्ष 2019-20च्या प्रोविजनलच्या आकड्यांनुसार, एअर इंडियावर एकूण 38,366.39 कोटी रुपयांचं कर्ज आहे.

एअर इंडिया एसेट्स होल्डिंग लिमिटेडचे स्पेशल पर्पज व्हीकल ला एअरलाइन्सद्वारे 22,064 कोटी रुपये ट्रान्सफर केल्यानंतरची ही रक्कम आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.