नेवाळे वस्तीत आढळला ‘१८ किलो’ वजनाचा नऊ फुटी अजगर

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील नेवाळे वस्ती चिखली येथे एका शेतकऱ्याच्या पत्र्याच्या घरात रविवारी (दि. 3) रात्री नऊ फूट लांबीचा 18 किलो वजनाचा अजगर आढळले. सर्पमित्रांनी त्याला पकफून सुखरूपपणे मुळशी तालुक्यातील घोटावडे परिसरातील वनपरिक्षेत्रात सोडून दिले. एवढे मोठे अजगर मानवी वस्तीत आल्याने चिखली परिसरात खळबळ उडाली आहे.

नेवाळे वस्ती येथील शेतकरी किरण नेवाळे यांच्या पत्र्याच्या घरात रविवारी रात्री अडीचच्या सुमारास साप दिसून आला. त्यानंतर सर्पमित्र वैभव कुरुंद यांना याबाबत माहिती देण्यात आली. घोणस जातीचा साप असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र कुरुंद यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता घरात भलामोठा अजगर असल्याचे दिसून आले. त्यामुळे कुरुंद यांनी मदतीसाठी सर्पमित्र विशाल पाचंदे, शुभम पांडे, योगेश कांजवणे, राजू कदम यांना बोलावले. त्यानंतर अजगराला पकडण्यात आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. तसेच मुळशी तालुक्यातील घाेटावडे परिसरातील वनपरिक्षेत्रात अजगराला सुरक्षितपणे सोडून जीवदान देण्यात आले.

इंडियन रॉक पायथन नावाचा हा बिनविषारी साप

”अजगर जातीचा इंडियन रॉक पायथन नावाचा हा बिनविषारी साप आहे. नऊ फुटांचा 18 किलो वजनाचा नरजातीचा सात ते सहा वर्षांचा साप आहे. त्याला नियमित खाद्य मिळाल्यास 22 फुटांपर्यंत लांबी होऊन तो 25 वर्षे जगू शकतो. नागरी वस्तीमध्ये अजगर आढळत नाही. डोंगर-दऱ्या, पहाडी भागात तो आढळतो. त्याच्या मादीची 50 ते 60 अंडी घालण्याची क्षमता असते. तसेच हा अजगर निशाचर असल्याने रात्री तो त्याचे सावज शोधत असतो. शेड्यूल वन मधील प्राणी असून याबाबत वनविभागाला माहिती दिली असल्याचे वैभव कुरुंद यांनी सांगितले.”

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.