पुणे जिल्हात घटस्थापनेपासून मंदिर उघडणार, प्रशासनाची नियमावली जाहीर ; ‘या’ नियमांचं करावं लागणार काटेकोर पालन

पुणे : राज्यातील मंदिरे घटस्थापनेपासून उघडली जाणार आहेत. पुणे जिल्हा प्रशासनाने याबाबत नियमावली जाहीर केेली आहे. यामध्ये लसींच्या दोन डोसची सक्ती केलेली नाही. मात्र, १० वर्षाखालील लहान मुले व ६५ वर्षे वरील ज्येष्ठांना मंदिर दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. तर मास्क बंधनकारक, सहा फुटाचे अंतर ठेवावे, साबण किंवा हॅंडवॉशने हात स्वच्छ धुवावेत, कुठल्याही प्रकारचे पूजेचे साहित्य व प्रसाद मंदिरात आणू नये, कोरोना रुग्ण आढळल्यास मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, या नियमांचे पालन करुनच मंदिरामध्ये प्रवेश करावा, असे या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून मंदिरे बंद होती. मंदिरे उघडण्याची मागणी विविध धार्मिक संघटना, विरोधी पक्षाकडून केली जात होती. आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या गुरुवारपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. त्यासाठीची नियमावली जाहीर केली आहे.

पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत ‘ब्रेक द चेन’चे सुधारित मार्गसूचना प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. यामध्ये स्थानिक प्रशासनाने याबाबत काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत. याबाबतचे आठ सूचना, तर त्या-त्या ठिकाणच्या मंदिर व्यवस्थापन-प्रशासनाने काय खबरदारी घ्यायची याबाबतच्या २७ प्रकारच्या विविध सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

या’ नागरिकांनी घरीच थांबावे!

आदेशानुसार ६५ वर्षे वयावरील नागरिक, को-मॉर्बिड लक्षणे असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्ष वयाखालील मुले यांनी घरीच थांबावे. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारे व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या ठिकाणी भेट देणारे नागरिक व काम करणाऱ्या कामगारांना कोविड- १९ ची लागण होऊ नये अथवा प्रसार होऊ नये याकरीता दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी सहा फुट अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.

मंदिरात जाण्यापूर्वी या गोष्टी बंधनकारक

मास्कचा वापर बंधनकारक, गर्दी न करता सहा फुटाचे अंतर पाळणे, हॅंडवॉशचा वापर करून हात स्वच्छ धुवावेत, विनाकारण कुठल्याही वस्तूला हात लावण्यास टाळावे, कुठल्याही प्रकारचे पूजेचे साहित्य व प्रसाद मंदिरात आणू नये, कोरोना रुग्ण आढळल्यास मंदिर बंद केले जाईल व पुन्हा मंदिर स्वच्छ करून उघडले जाईल, असे या वेळी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

आरोग्यसेतूचा वापर

भाविकांच्या आरोग्याबाबत पाहणी करुन आजारी असल्यास आजाराबाबत राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. धार्मिक स्थळे अथवा प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी थुंकण्यास बंदी राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यात यावा.

धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनासाठी सूचना

प्रवेशद्वारावर हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी व थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच मंदीरात प्रवेश देण्यात यावा. कोविड-१९ विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजना दर्शविणारे फलक अथवा भित्तीपत्रके ठळक अक्षरात दिसतील अशा ठिकाणी लावावीत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत श्राव्य किंवा चित्रफीतद्वारे दररोज प्रसारण करावे. अभ्यागतांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात यावा. धार्मिक स्थळांचा आकार, खेळती हवा या बाबी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था यांचेमार्फत ट्रस्ट किंवा बोर्डाच्या अध्यक्षांनी धार्मिक स्थळात एका वेळी किती व्यक्ती किती वेळेसाठी थांबवता येतील याचा विचार करुन वेळा ठरवून द्याव्यात.

पादत्राणे वाहनांमध्येच…

पादत्राणे हे स्वतःच्या वाहनांमध्ये ठेवणेबाबत भाविकांना सूचित करावे. आवश्यकतेनुसार पादत्राणे ठेवण्यासाठी स्वतंत्ररित्या व्यवस्था करण्यात यावी. वाहनतळांच्या ठिकाणी व आवारात गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून व्यवस्थापन करण्यात यावे. बाहेरील आवारात असलेली दुकाने, स्टॉल्स, उपहारगृहाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन व कोविड नियमावलींचे पालन करुन गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.

सोशल डिन्टन्सिंग अनिवार्य!

दर्शन घेण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन रांगेत उभे राहण्यासाठी खुणा करुन सहा फुट अंतर ठेवण्यात यावे. अभ्यागतांसाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमनाबाबत व्यवस्था करण्यात यावी. रांगेमध्ये उभे राहतांना दोन भाविकांमध्ये सहा फुट अंतर ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची राहील. नागरिकांनी याठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय साबण व पाण्याच्या सहाय्याने स्वच्छ धुवावेत. नागरिकांना बसण्याकरीता सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन बैठक व्यवस्था करण्यात यावी. वातानुकूलीत करीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सूचनांचे पालन करण्यात यावे. वातानुकूलीत आवारात तापमान हे २४-३० डिग्री करण्यात यावे व सापेक्ष आर्द्रता ४०-७० असावी, तर पुरेशी खेळती हवा असण्याबाबत दक्षता घ्यावी.

‘मूर्ती ,पुतळा , पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध’ 

मूर्ती ,पुतळा , पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास प्रतिबंध राहील. मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे मेळावे किंवा एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.कोविड- १९ पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता ध्वनीमुद्रीत केलेले भक्तीपर गाणे, संगीत वाजवण्यात यावे. परंतू वादक किंवा गायन गटास प्रतिबंध राहील. शारिरीक संपर्क टाळण्यासाठी नागरिकांना शुभेच्छा देण्यास प्रतिबंध राहील. सामुहिक प्रार्थनेसाठी एकच चटाईचा उपयोग शक्यतो टाळावा. भक्तांनी स्वतःकडील चटाई किंवा कापडाचे तुकडे घरुन आणावे व परत जातांना सोबत घेऊन जावे.

‘प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी शिंपडणे मनाई!

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणतेही अर्पण उदा. प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी बाबी प्रतिबंधीत राहतील. धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रभावीपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. आवारात असलेले शौचालये व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा. धार्मिक स्थळांचा परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याची जवाबदारी संबंधित ट्रस्ट किंवा संस्था यांची राहील. परिसरातील तळफरशीचा भाग वारंवार स्वच्छ करण्यात यावा.
अभ्यागतांनी सोडून किंवा फेकून दिलेले फेस कव्हर,मास्क,ग्लोव्हज इत्यादींचे योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात यावी. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कामगार, कर्मचारी यांना कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी पुरेसे साहित्य असणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कामावर हजर होण्यापूर्वी तसेच आठवड्यातून कोविड-१९ चाचणी करणे आवश्यक राहील. शौचालये तसेच खाणावळी परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जागा, अंतर व संख्या याबाबतचे व्यवस्थापन कोविड नियमावलींचे पालन करुन करण्यात येईल. याबाबतचे हमीपत्र पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे आवश्यक राहील.

तरीही करोना रुग्ण आढळल्यास?

धार्मिक स्थळांच्या परिसरात कोविड-१९ चे संशयीत रुग्ण अथवा बाधित रुग्ण आढळून आल्यास अशा व्यक्तीस एका स्वतंत्र खोलीमध्ये किंवा परिसरात इतर लोकांपासून विलगीकरण करावे.अशा व्यक्तीस वैद्यकीय अधिकारी यांचेकडून पडताळणी होईपावेतो चेहऱ्यावर मास्क परिधान करणेबाबत सूचित करावे.अशा रुग्णाची माहिती तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयास कळविण्यात यावी. अशा रुग्णांचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत परिक्षण करण्यात येईल व सदरची केस हाताळण्याबाबत आवश्यक ते व्यवस्थापन करून अशा व्यक्तींचे संपर्कात असलेल्या व्यक्तीचा शोध घेवून तो राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येईल. बाधित रुग्ण आढळून आल्यास तेथील आसपासचा परिसर तात्काळ निर्जंतुकीकरण करावा.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर व्यक्ती ही भारतीय दंड संहिता, १८६०, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 कोणत्या मंदिराचे काय नियम?

‘चतुश्रृंगी’च्या दर्शनासाठी नियम पाळणे बंधनकारक!

गुरूवापासून नवरात्री उत्सवाला सुरूवात होत आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व विश्वस्त व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. येणाऱ्या भाविकांनी लस घेतलेली असावी. मंदिर सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी यंदा कोणत्याही प्रकारची स्वतंत्र रांगेची व्यवस्था नसेल. तर मंदिराची मोठी जागा असल्याने एका वेळी १ हजार लोकांना सामावून घेऊ शकतो. मात्र, त्याबाबत पोलीस प्रशासनाशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे चुतुश्रंगी मंदिराचे व्यवस्थापक दिलीप अनगळ यांनी सांगितले. तसेच कोरोनाचे प्रादूर्भाव लक्षात घेऊन शासनाने सांगितलेले नियम पाळणे भाविकांना बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भीमाशंकर’ला रोज ३ हजार भक्तांनाच दर्शन

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे एसटी बस स्थानक ते कोंढवळ फाटा या दरम्यान नवीन रस्त्याचे काम चालू आहे. वाहने पुढे आणल्यास वाहतूककोंडी अथवा अपघात होऊ नये यासाठी येणार्‍या भाविक भक्तांनी भीमाशंकर पासून अलीकडे दोन-तीन किलोमीटर वाहने उभी करुन दर्शनासाठी येवून आपली होणारी गैरसोय टाळावे. तसेच श्री क्षेञ भीमाशंकर देवस्थान व प्रशासनाला सहकार्य करावे.

– ॲड. सुरेश कौदरे, अध्यक्ष, श्री क्षेञ भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट

‘मोरगाव’च्या मंदिरात मास्क शिवाय प्रवेश नाही

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टने दर्शन रांगेमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी मार्किंग केले आहे. सर्व भाविकांना हातावर सॅनिटायझर देऊनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण मंदिरामध्ये दिवसातून दोन वेळा प्रसंगी अधिक वेळा सॅनिटायझेशन केले जाणार आहे. मास्क शिवाय कुठल्याही भाविकाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे शासकीय नियमाचे अधिकाधिक अंमलबजावणी करण्यासाठी जागोजागी सुरक्षा रक्षक व सफाई कामगाराचे आयोजन केले जाणार आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.