गुन्हेगारी टोळीचा जम बसविण्यासाठी खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक ; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

पुणे : आपल्या टोळीचा पुण्यात जम बसविण्यासाठी टिंबर मार्केटमधील व्यापार्‍याला २ लाख रुपयांची खंडणी मागून ती घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या एका सराईत गुन्हेगारासह तिघांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. खुनाच्या गुन्ह्यातुन ८ वर्षांनी पॅरोलवर कारागृहाबाहेर पडल्यानंतर आरोपीने हा गुन्हा केला.

विशाल ऊर्फ जंगल्या शाम सातपुते (वय ३२, रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ), मंगेश शाम सातपुते (वय ३६) आणि अक्षय दत्तात्रय भालेराव (वय २६, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका ४६ वर्षाच्या व्यापार्‍याने येरवडा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरातील होलसेल विक्रीचे व्यावसायिक आहेत. २८ सप्टेंबर २०२१ पासून त्यांच्या मोबाईलवर विशाल सातपुते याच्याकडून वेगवेगळ्या मोबाईलचा वापर करुन सतत फोन करून दोन लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती. ‘मी पुण्यातील भाई आहे, माझ्या टोळीचा मला जम बसवायचा आहे. तुला टिंबर मार्केटमध्ये धंदा करायचा असेल, तर मला दोन लाख रुपये दे. पैसे न दिल्यास संपवून टाकेल” अशी धमकी देऊन खंडणीची मागणी करीत होता. या व्यापार्‍याने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर पैसे घेण्यासाठी या गुंडांना विमाननगर येथील हॉटेल हयात रिजेन्सी येथे बुधवारी सायंकाळी बोलविण्यात आले होते. पोलिसांनी सापळा रचला होता. फिर्यादीकडून या गुडांनी १ लाख रुपये स्वीकारली असताना पोलिसांनी त्या तिघांना रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

विशाल ऊर्फ जंगल्या श्याम सातपुते याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी असे विविध ४ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. विशाल सातपुते व त्याच्या टोळीतील ६ जण अशा ७ जणांना पुणे पोलिसांनी गुन्हा वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले होते. त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे आणि कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.