जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या ; उस्मानाबादमधील धक्कादायक घटना
उस्मानाबाद : मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जात पंचायतीने २ लाख रुपयांचा दंड करून त्याच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने उस्मानाबादेतील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमनाथ छगन काळे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या त्यांच्या नातेवाइकांनी मंगळवारी (ता. पाच) मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून जात पंचायतीच्या म्होरक्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ठिय्या दिला.
उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील व सध्या उस्मानाबाद शहरात राहत असलेल्या सोमनाथ काळे याचे त्याच्या मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरविली होती. त्यात सोमनाथला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी २० हजार रुपये दंड वसूलदेखील करण्यात आला होता.
मात्र, उर्वरित १ लाख ८० हजार रुपये वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे तगादा लावला होता. हे पैसे देण्यास उशीर केल्यास घृणास्पद शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी धमकी त्याला दिली जात होती. याच जाचाला कंटाळून सोमनाथ व त्याच्या पत्नीने २२ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.सोमनाथची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी सोमनाथचा मृत्यू झाला.
याप्रकरणी जात पंचायतीच्या पंचांवर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नातेवाईकांनी मृतदेहासह आक्रोश केला. अखेर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तहसीलदार गणेश माळी यांनी, संबंधितांवर गुन्हे दाखल करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!