आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; आजचाही मुक्काम जेलमध्येच

मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. तर दुसरीकडे मुंबई न्यायालयाच्या निकालाविरोधात आम्ही सत्र न्यायालकडे दाद मागू असे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे.

मुंबईतल्या समुद्रात क्रूझवर छापा मारल्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, इस्मित सिंग, नुपूर सारिका, विक्रांत चोकेर, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा यांना अटक केले होते. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली.

आज आर्यन खानला जामीन मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आज आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामिनासाठी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अडीच तासांच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आता या निकालानंतर आर्यन खानला काही दिवस मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.  उद्या याप्रकरणी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं ?

जेव्हा बोलवाल तेव्हा आर्यन चौकशीला येईल

युक्तिवादादरम्यान, मानेशिंदे यांनी आर्यन खानला जामीन मिळावा अशी कोर्टाकडे मागणी केली. त्यासाठी त्यांनी कोर्टाला एकूण 22 निकालांचा हवाला दिला. तसेच आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, असेदेखील ते म्हणाले. आरोपींना जामीन देण्याबाबत जे अधिकार हायकोर्ट आणि सेशन कोर्टला आहेत. तेच अधिकार महानगरीय कोर्टालाही आहेत.  आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही, एक ग्रॅमदेखील ड्रग्ज सापडलेले नाही. म्हणून जामीन मिळावा. आर्यन खानकडे चॅटशी निगडित मटेरियल सापडलं आहे. तो जामिनास पात्र आहे. आरोपी जामिनावर असूनसुद्धा चौकशीला सहयोग करू सकतो. जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा चौकशीसाठी यायला तयार आहे, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला.

काय झालं होतं?

मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) त्याची चौकशी सुरू झाली. जे. जे. मेडिकल महाविद्यालयात आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

आर्यन खानसह याप्रकरणात आठ जणांना NCB ने ताब्यात घेतलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा अशी त्यांची नावे आहेत, असं विभागाने सांगितलं.

या सर्वांचा संबंध मुंबईतील क्रूझवर होत असलेल्या कथित रेव्ह पार्टीशी आहे. त्याबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असं NCB मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल, असं मत NCB प्रमुख एस. एन. प्रधान यांनी नोंदवलं आहे. “आम्ही या प्रकरणात अतिशय निःपक्षपातीपणे काम करत आहोत. या प्रकरणात बॉलीवूड अथवा धनाढ्य लोकांचाही संबंध असल्याची माहिती मिळतेय, पण तरीही आमचं काम आम्ही निःपक्षपातीपणे करू. कायद्याच्या कक्षेत राहूनच आम्हाला कामाची अंमलबजावणी करावी लागेल,” असं प्रधान म्हणाले.

मध्यरात्री केली कारवाई

मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रूझवर ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. क्रूझ समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर ही पार्टी सुरू झाली होती, अशी माहिती एनसीबीनं दिली.

ड्रग्जचं सेवन सुरू केल्यानंतर एनसीबीच्या पथकानं या सर्वांना रंगेहाथ अटक केली. त्यामध्ये एका अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश होता. शनिवारी निघालेली ही क्रूझ सोमवारी मुंबईला परतणार होती, अशी माहिती मिळाली होती.

पोलिसांनी कारवाई केलेली क्रूझ काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. तसंच या पार्टीसाठी क्रूझचं तिकिट 80 हजार रुपये एवढं असल्याचंही काही माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

NCB ने मुंबईच्या समुद्रात क्रुझ पार्टीवर केलेल्या कारवाईवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही प्रतिक्रिया दिली.

गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्ज कारवाईचे पुढे काय झाले? या छोट्या कारवाया त्या घटनेवर पडदा टाकण्यासाठी तर नाहीत ना, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.