नागपुरात सातव्या मजल्यावरून उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

नागपूर : पतीच्या नातेवाईकाकडून सोडचिठ्ठी देण्यासाठी होणाऱ्या दबावाला कंटाळून विवाहितेने सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ऋतू पंकज खडसे (३१, रा. जयंतीनगरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ऋतू हीसुद्धा इंजिनिअर आहे. तर तिचा पती पंकज हा सॉफ्टवेअर अभियंता आहे. ऋतू ही मूळची राजस्थानची असून ती चेन्नईतील मामाकडे राहत होती. नोकरी करीत असताना ऋतू आणि पंकज यांची ओळख झाली. दोघांनी प्रेमप्रकरणानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, पंकजच्या कुटुंबीयांना त्यांचे लग्न मान्य नव्हते.

पंकजचे नातेवाईक सोडचिठ्ठी देण्यासाठी ऋतूवर दबाव टाकत होते. त्यामुळे ती तणावात होती. याच कारणावरून बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ऋतूने सातव्या मजल्यावरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ऋतूचे आई-वडील राजस्थानवरून नागपुरात आले. त्यांनी ऋतूचा पती आणि सासरची मंडळी छळ करीत होते. तिला घटस्फोट देण्यासाठी बळजबरी करीत होते, अशी लेखी तक्रार दिली. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.