पवार कुटुंबियांवरील छापे म्हणजे राजकीय षडयंत्र – संजोग वाघेरे

पिंपरी चिंचवड :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कार्यालयात आणि घरी केंद्रीय आयकर विभाग सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शुक्रवारी)  कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केले. केंद्र सरकारने केलेली ही कारवाई हेतुपुरस्सर असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तसेच केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

देशभर वाढलेले इंधनदर, महागाईचा आगडोंब उसळला आहे. रोजच वाढत्या महागाईमुळे देशभरातील नागरिकांमध्ये
केंद्र सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. शेतक- यांच्या आंदोलनात वाहने अंगावर घालून त्यांना चिरडून ठार करण्यात आले. यामुळे देशभरातील शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याकडे माध्यमांचे लक्ष जाऊ
नये या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी व कार्यालयात ईडी आणि आयटीचे छापे टाकण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरु केलेली ही कारवाई
सुडबुद्दीचे आणि नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे राजकीय षडयंत्र असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली.

आमदार आण्णा बनसोडे म्हणाले की, भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांचेही साखर कारखाने व इतर उद्योग, व्यवसाय आहेत. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई नाही. पुरोगामी महाराष्ट्रात औद्योगिक व सामाजिक क्रांती घडविणारे लोकनेते शरद पवार
यांनी लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनावर टिपणी केली. त्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारच्या ईडी व आयटीने ही कारवाई केली.

माजी आमदार विलास लांडे या कारवाईबाबत केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले की, केंद्राची ईडी व आयटी हे मोदी, शहा यांचे घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहेत. मोदी, शहा यांच्या ईशा-यावर डोंबा-याच्या खेळाप्रमाणे वागत आहेत..राजकारणातून समाजकार्य कसे करावे याचा आदर्श म्हणजे लोकनेते शरद पवार आणि अजित पवार हे आहेत. त्यांच्या कुटूंबियांना त्रास देऊन महाराष्ट्रातील राजकरण विस्कळीत करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे.

आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल,  वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,  नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पोर्णिमा सोनवणे, संगीता ताह्मणे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, काळूराम पवार, राजेंद्र साळुंखे, प्रसाद शेट्टी, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सारिका पवार, कविता खराडे, गंगा धेंडे आदी कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले आहेत.  “आम्ही सदैव अजितदादांसोबत”, wee support ajit dada, “आमची ताकद, आमचा अभिमान अजितदादा” असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते. हाताला काळी फित बांधली होती.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.