सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला’ – उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या दोन राजकीय कट्टर विरोधकांमध्ये शाब्दिक टोलेबाजी पहायला मिळाली. 16 वर्षानंतर हे दोन दिग्गज नेते एका व्यासपीठावर आले होते. त्यामुळे हे दोन नेते काय बोलणार याकडे सार्वांच्या नजरा लागल्या होत्या. यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणावर पलटवार केला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला नाहीतर काहीजण म्हणतील तो आम्हीच बांधला, अशा शेलक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं.

मुख्यमंत्री भाषणात म्हणाले, “आजचा क्षण मला वाटतं आदळ आपट करण्याचा नाही. तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी तुमचं खास अभिनंदन करतोय. कारण तुम्ही इतकं लांब राहून देखील मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीचे असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू? जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. अनेकदा मी म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते शिवसेनाप्रमुख.”

तसेच, “कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावर बोलायचं तर खूप बोलता येईल, बोलेनही कदाचित पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचे वैभव ही जी संपन्नता आहे. ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक आणि त्या सुविधांमधला सगळ्या मोठा भाग असतो तो, विमानतळांचा आणि त्या विमानतळाचं लोकार्पण आज झालेलं आहे.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

आजपर्यंत अनेकजण येऊन गेले

पर्यटन… पर्यटन… आजपर्यंत अनेकजण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करु आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असं कोकण मी उभं करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. उर्वरित गोष्टी आदित्यने  व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. पाठांतर करुन बोलणं वगेळं आणि आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं. मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेन, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.