डिझेल चोरी करणा-या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याला अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्याला यवत पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यावर यवत पोलीस ठाण्यातील दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

राजवीर गजराजसिंग मल्होत्रा (वय 36, सध्या रा. गावडेवाडी केसनंद ता. हवेली, जि पुणे. मुळ रा.दिल्ली) असे या डिझेल चोरीच्या टोळीतील म्होरक्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील पारगाव येथील सचिन अरूण बोत्रे यांच्या ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून 500 लिटर डिझेल 30 ऑगस्ट 2021 रोजी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची फिर्याद यवत पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दौंडसह जिल्हयात रस्त्यावर,घरासमोर,हॅाटेल,ढाब्यासमोर थांबलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ झाली होती.

जिल्हयात डिझेल चोरी करणाऱ्या या टोळीने ग्रामीण पोलीसांची झोप उडवली होती. ग्रामीण पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी डिझेल चोरांचा शोध घेऊन त्यांना लवकर अटक करण्याच्या सूचना ग्रामीण पोलीसांना दिल्या होत्या. त्यानुसार यवत पोलीसांनी हवेली तालुक्यातील केसनंद येथे डिझेल चोर राजवीर मल्होत्रा येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार यवत पोलीसांनी त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. डिझेल चोरीबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलीसांनी पोलीस खाक्या दाखवताच तो बोलता झाला. त्याचे इतर साथीदार कालिया उर्फ बासीर रूत्तम खान ( रा. गडरोली मकसाई शहाजापुर मध्य प्रदेश ) ईशान उर्फ इशक मेव (रा. उजैन मध्य प्रदेश ), आज्जु उर्फ आशिक हुसेन महम्मद हुसेन (बेगमबाग उज्जैन मध्य प्रदेश), फिरोज उर्फ भटटा उर्फ शैकत कालु शहा (रा. मकसाई गडरोली मोहला साहजापुर मध्ये प्रदेश ) यांच्या मदतीने यवत परिसरामध्ये थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी केल्याची कबूली दिली.

या टोळीने यवत पोलीस स्टेशन हददीतील 10 ठिकाणी डिझेल चोरी केली असून त्यांच्याकडून एक हजार लिटर डिझेल, एक जीप , एक टेम्पो,असा एकुण किंमत 14 लाखांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी असल्याचे पोलीसांच्या तपासात उघड झाले असून या टोळीकडून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.

ही कामगिरी ग्रामीण पोलीस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, सहाय्यक फौजदार जयसिंग जाधव, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, पोलीस नाईक महेंद्र चांदणे, रामदास जगताप,विकास कापरे, विशाल जाधव, पोलीस शिपाई राहुल गडदे,गणेश भापकर, भारत भोसले, निखिल रणदिवे, मारूती बाराते आदींच्या पथकाने  केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.