पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई :- पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पुण्याचे पालकमंत्री तथा राज्य कबड्डी संघटना तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाहीत. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!