गाडीला कट मारल्याच्या कारणातून वाद, मारहाणीत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; उरुळीकांचन परिसरातील घटना
लोणी काळभोर : चारचाकी गाडीला दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथील बागडे ते मळा भवरापूर रोड उरुळीकांचन परिसरात घडली आहे. याप्रकरणी रात्र लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय अंकुश टिळेकर (वय. २३, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ अमर अंकुश टिळेकर ( वय २४ रा. टिळेकरवाडी, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तिन अनोळखी इसमांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय टिळेकर हा दुचाकीवरुन रस्त्याने निघाला होता. यावेळी त्याचा एका चार चाकी स्विफ्ट गाडीला धक्का लागला. त्यातूनच गाडीतील नागरिक व त्याची वादावादी झाली. वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यावेळी स्विफ्ट गाडीतील तीन ते चार जणांनी अक्षय याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
यावेळी अमर घरी असतांना चुलत भाऊ प्रशांत टिळेकर याने अक्षयला बगाडे मळ्याच्या पाटीपाशी तिघे मारहाण करीत असल्याचे कळवले. तो तातडीने चुलत भाऊ धमेंद्र यास घेऊन घटनास्थळी पोहोचला.तेथे लोक जमा झाले होते. त्यावेळी अक्षय यास मारणारे तिघे कारमध्ये बसताना अमरने पाहिले. ते भवरापुरचे दिशेने निघून गेले. त्यावेळी अमरसह काही जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. गाडी वेगात गेल्याने त्यांना थांबवता आली नाही. त्यानंतर अमरने लोकांकडे विचारपूस केली. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून भांडण करत कारमधील तिघांनी अक्षय मारलं असल्याचे लोकांनी सांगितले. अक्षय रस्त्याच्या कडेला निपचीत पडला होता. त्यांस रूगणवाहिकेतून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन येथे नेले. तेथे सुविधा नसल्याने खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. सदर ठिकाणी तपासणी करुन डॉक्टरांनी अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार हे करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!