पुण्यात राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या सॉफ्टवेअर अभियंताचा खूनच; दोघा मित्रांना अटक

पुणे :पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वतः वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात होता. परंतु या प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी  या खून प्रकरणी त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती.

सागर दिलीप बिनावत (वय ३३, रा. श्रद्धानगर, कोंढवा) आणि दत्तात्रय देवीदास हजारे (रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश तारळेकर (वय ४७, रा. सन फ्लॉवर सोसायटी, कोंढवा) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.. याप्रकरणी स्फूर्ती गणेश तारळेकर (वय 42) त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तारळेकर हे विवाहित असून त्यांना एक १४ वर्षाचा मुलगा आहे. कौटुंबिक भांडणामुळे त्यांची पत्नी मुलासह एक वर्षापासून स्वत:च्या वडिलांकडे राहत आहेत. गेल्या रविवारी दुपारी गणेश तारळेकर हे आपल्या दोन मित्रांसह घरात पार्टी करीत होते. त्यावेळी गणेश यांनी पिस्तुल काढून आत्महत्या करणार असल्याचे सांगत गोळी झाडून आत्महत्या केली.

या प्रकाराने दोघे मित्र घाबरुन गेले. ते तारळेकर यांना तसेच घरात टाकून पळून गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी ही बाब पोलिसांना
कळविली. कोंढवा पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता तारळेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.

जवळपास एक दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून होता. या घटनेच्या दोन दिवस अगोदर गणेश तारळेकर यांनी त्यांच्या सासऱ्यांना फोन करुन आपण आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली होती. तशी तक्रार त्यांनी कोंढवा पोलिसांकडे केली होती. या दोघा मित्रांनी सांगितलेली हकीकत आणि या घटनेच्या दोन दिवस अगोदरची घटना त्यामुळे सुरुवातीला गणेश तारळेकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा संशय होता. ज्या वेळी हा प्रकार घडला त्या वेळी गणेश आणि त्यांचे दोन मित्र घरात पार्टी साजरी करत होते. त्याच्या मित्रांनी पोलिसांना ही माहिती दिली होती. मात्र पोलिसांना वेगळाच संशय होता.

त्यानंतर कोंढवा पोलिसांनी या दोन्ही मित्रांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता या दोघांनी दारू पार्टी साजरी करीत.असताना संगणमत करून कोणत्या तरी कारणावरून डोक्यात गोळी झाडून गणेश तारळेकर यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पिस्तूल विहिरीत फेकून दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.