शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदार राजू नवघरेंकडून गंभीर चूक ; निलेश राणें म्हणाले

मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. काल शहरामध्ये महाराजांच्या पुतळ्याच आगमन झालं. यावेळी वसमतचे राष्ट्रवादीचे  आमदार राजू नवघरे यांनी पुतळ्याच स्वागत करत असताना, चक्क महाराजांच्या पुतळ्यावर चढून, छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला.  हा  व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यावरून राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला आहे.

या प्रकरणावरून भाजपनेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर आमदार नवघरे यांची पक्षातून हकालपट्टी करा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे.

निलेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके टाकले पाहिजे. या पक्षात सारे औरंगजेबासारखे आहेत. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. असे खरमरीत ट्वीट त्यांनी केले आहे.

चूक लक्षात येताच आमदार राजू नवघरे यानी माफी मागितली

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर  आमदार राजू नवघरे यांनी माध्यमांसमोर येत माफी मागितली आहे. माध्यमांशी बोलताना आमदार  नवघरे यांना रडू देखील कोसळले. “मी एकट्यानेच पाप केले असेल तर मला फाशी द्या.  अनेक जण माझ्यासोबत शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी घोड्यावर चढलो तर टीकेची झोड माझ्यावरच का? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. “माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा”,  अशा शब्दात राजू नवघरे यांनी सर्व शिवप्रेमींची माफी सुद्धा मागितली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.