ऐन निवडणुका तोंडावर आल्याने रिपाइं(आठवले) पक्षाला मोठा झटका ; ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांचा राजीनामा
ठाणे (गौतम वाघ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(A) ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन रिपाइं मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंगे यांच्याकडे त्यांनी शुक्रवारी अध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्त केला. २००७ पासून ते या पदावर कार्यरत होते. त्यांच्या राजीनाम्याने ठाण्यात रिपाइं पक्षाला मोठा धक्का बसला असून महानगरपालिकांच्या येत्या निवडणूकांवर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिकेत त्यांच्यासह तीन नगरसेवक निवडून आले होते. पदाचा राजीनामा देताना त्यांनी वैयक्ति कारण सांगितले असले तरी ते पक्षाच्या कार्य पद्धतीवर नाराज असल्याचे समजते. ठाण्यातील राजकीय वर्तुळात त्यांनी एक दरारा निर्माण केला आहे. ठाणे जिल्ह्यात रिपाइं पक्षाला बळकटी देण्यात तसेच पक्षाला वेगळी ओळख करून देण्यात त्यांना फार मोठे यश आले होते. महानगर पालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना त्यांनी राजीनामा दिल्याने ठाणे जिल्ह्यात त्यांच्या राजीनाम्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्यात रिपाइंची मोठी हानी होणार असल्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आता तायडे कोणता निर्णय घेणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!