बाॅडी बनवण्याच्या इंजेक्शनची अवैद्यरित्या व बेकायदेशीरपणे विक्री करणा-या चार आरोपींना अटक

पुणे :   बाॅडी बनवण्याच्या इंजेक्शन डाॅक्टरांचे प्रिस्क्रीप्शन द्वारेच विक्री करणे बंधनकारक असलेले मेफनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन अवैधरित्या जवळ बाळगून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या चार आराेपींना बिबवेवाडी पाेलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाेलीसांनी 211 इजेक्शन औषधाचे बाॅटल्स, एक स्विफ्ट कार असा एकूण दाेन लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

परेश निवृत्ती रेणुसे  (वय 33, रा. संभाजीनगर, धनकवडी), प्रवीणसिंग पुकसिंग भाटी (वय 23,रा. दांगट पाटील नगर, शिवणे),
अक्षय संभाजी वांजळे (वय 26,रा. गणपती माथा, वारजे माळवाडी), शौनक प्रकाश संकपाळ(वय 28, रा. बहिरटवाडी, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात एकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शरीरसौष्ठव व शरीरयष्टी वृद्धीसाठी मेंफरटाईन सल्फेट इंजेक्शनची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून परेश रेणुसेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 6 बाटल्या जप्त केल्या. रेणुसेकडे सखोल चौकशी केली असता त्याने हे औषध शौनक संकपाळ याने विक्री करण्यासाठी दिली असल्याचे सांगितले.

दरम्यान, या घटनेची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक अतिश सरकाळे यांना देण्यात आली. सरकाळे यांनी पोलिसांनी जप्त केल्या औषधांची तपासणी केली. त्यावेळी रेणुसे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदा औषधाची विक्री करत असल्याचे समोर आले.तपासात मिळालेल्या माहितीनंतर आरोपी भाटी, वांजळे, संकपाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 211 बाटल्या आणि एक कार जप्त करण्यात आली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे , पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर, सहाय्यक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग, सचिन फुंदे, संतोष जाधव, नितीन धोत्रे तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागातील निरीक्षक अतिश सरकाळे यांनी ही कारवाई केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.