साताऱ्यात दुर्मिळ मांडूळ साप व कासव विकणाऱ्या चौघांना अटक
कराड : ओगलेवाडी-राजमाची येथे मांडुळ प्रजातीच्या दुर्मीळ सापाची व कासवाची तस्करी करणार्या चौघांना वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी अटक केली. संशयितांकडून दोन्ही प्राणी जप्त करण्यात आले आहेत.
रोहित साधू साठे (वय 20), प्रशांत रामचंद्र रसाळ (वय 20), अविनाश आप्पा खुडे (वय 21, तिघे रा. अकलूज, जि. सोलापूर) व सुनील तानाजी सावंत (वय 28, दिवड, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजमाची (ओगलेवाडी) येथे सांज सावली हॉटेलमध्ये जेवण करत बसलेल्या चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, वनरक्षक विजय भोसले (फिरते पथक, सातारा) यांनी हॉटेलमध्ये जाऊन संशयितांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळच्या पिशवीत जिवंत कासव व दुसऱ्या पिशवीत जिवंत मांडूळ सापडले.
हे कासव इंडियन सॉफ्ट शेल्ड टर्टल प्रजातीचे आणि मांडूळ कॉमन सॅनड बोआ या प्रजातीचे आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या शेड्युल 1 (भाग 2) व शेड्युल 4 मध्ये हे प्राणी येतात. हे वन्यप्राणी पकडणे, बाळगणे, त्यांची विक्री करणे, मारणे हा कायद्याने गुन्हा आहे. या संशयितांकडून वन्यप्राण्यांबरोबर दुचाकी, चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!