पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; उरुळी कांचन परिसरातील घटना
पुणे : पतीचे विवाहबाह्य संबंध आणि माहेर वरू दोन लाख रुपये आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून उरुळी कांचन येथील एका विवाहितेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार १७ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरे, नणंद, चुलत सासू-सासरे यांंच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शीतल विपुल नेवसे (वय २८) हिने आत्महत्या केली आहे. तर पती विपुल नेवसे, सासू पुष्पा नेवसे, सासरा विलास नेवसे, चुलत सासरे कैलास नेवसे, चुलत सासू जयश्री कैलास नेवसे (सर्व रा. उरुळी देवाची), नणंद योगिता रासकर (रा. भेकराईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शीतल हिचे विपुल नेवसे याच्याशी २०१४ मध्ये लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांचा मुलगाही आहे. लग्नानंतर काही दिवसांतच विपुल दारू पिऊन शीतलला मारहाण करत होता. विपुलचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याने त्यावरूनही त्यांच्यात वाद होत होता. तसेच माहेरून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा छळ करण्यात येत होता.
चुलत सासऱ्यांनीही शीतलचा हात धरून तिचा विनयभंग केला असल्याची तक्रार शीतलने तिच्या वडिलांकडे केली होती. अखेर सासरच्या छळाला कंटाळून शीतलने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतलचे वडील रोहिदास तुळशीराम सायकर यांनी पोलिसांत सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!