सर्वोत्तम पोलीस दल अशी ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे. जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल संवर्गातर्फे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, पोलीस अंमलदार यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण असला तरी राज्य शासनासाठी हा समाधानाचा क्षण आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांचे स्वतःचे असे स्वप्न असते, त्यांना भावना असतात. पोलीस हे राज्य शासनाचा कणा आहे. या सर्वांचा कणा ताठ ठेवणे, त्यांचा माणूस म्हणून विचार करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यांना पुरेशा सोयीसवलती उपलब्ध करुन देण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे पोलीस अंमलदार यांना अधिकारी पदापर्यंत कामाची संधी मिळणार आहे. यामुळे चौकशी अभावी प्रलंबित प्रकरणांचा छडा लावणे तसेच प्रकरणे निकाली काढण्यास गती मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  पोलीस अंमलदारांसाठी कॅशलेस उपचार तसेच खेळाडूंना पदोन्नती या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून गृह विभागाने यासंदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 पोलीस विभागाची ताकद वाढणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होताना अधिकारी म्हणून निवृत्त व्हावा ही दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते. परंतु निर्णय झाला नव्हता. मी गृहमंत्री म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर पोलीस महासंचालक यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला संमती देऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस विभागाची ताकद तसेच क्षमता वाढणार आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या शासनाच्या भूमिकेला चालना मिळणार असून गुन्हे निकाली निघण्यास गती मिळणार आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण हे नेहमी अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेला कागदातला मजकूर वाचण्यापेक्षा त्यातील भावना समजून घेणे आवश्यक आहे असे सांगत. आज या तत्त्वाचा सर्वांनीच अंगीकार करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी पोलीस अंमलदार रवी गर्जे, मुकेश पाटील, श्री.शेलार, विनिता वाघ, गणेश पलांडे यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले. या सोहळ्याला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे येथील पोलीस अंमलदार प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.