रुपाली चाकणकर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची अखेर नियुक्ती झाली आहे. याबद्दल राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं.

रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच याबद्दल अधिसूचना काढण्यात आली आहे.
रुपाली चाकणकर या उद्या महिला आयोगाचा पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांना बढती मिळाली होती त्यांनी या संधीच सोनं करत वेळोवेळी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजपकडून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर याच्यात अनेकवेळा शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी निवड झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चित्रा वाघ यांचा चांगलाच तिळपापड झाला. चित्रा वाघ यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला होता.

दरम्यान, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यातच राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होतं.
त्यामुळे आघाडी सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत होतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत रुपाली चाकणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

दौंडमधील शेतकरी कुटुंबातचाकणकर यांचा जन्म झाला. रतत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला.

 

नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.  आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.