देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहण्यासाठी आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे :- देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील, त्यासाठी कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल. तसेच ”राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे, दिवाळीच्या नंतर परिस्थिती अशीच राहिली आणि आणखी चांगली झाली तर संपूर्ण क्षमतेने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना आम्ही परवानगी देणार आहोत, अशा शब्दांत त्यांनी चित्रपटगृह चालकांना दिलासा दिला. राज्यासह पुण्यातील नाट्यगृह शुक्रवारपासून रसिकांसाठी खुली झाली.

बालगंधर्व रंगमंदिर येथे अजित पवार यांच्या हस्ते ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, पूजा पवार, जयमाला इनामदार, सुरेश विश्वकर्मा, गिरीश परदेशी, प्रशांत जगताप, लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, कोल्हापूर आणि मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे. १९ महिने नाट्यगृह बंद राहिल्याने कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास नाट्यगृहात १०० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी देण्यात येईल.

कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे. एकल कलावंतांना ५ हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील संस्थांना ५० ते ७० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समितीद्वारे एकल कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात अडचणी आल्यास त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राज्याचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनीही या क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. सांस्कृतिक चळवळ अधिक गतीने पुढे नेण्याचे प्रयत्न शासन करीत आहे.  राज्याच्या विकासाचा विचार करताना कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचार तेवढाच महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी एक कुटुंब म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत कला क्षेत्रातील व्यक्तींच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक असल्याने त्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

यावेळी श्री.मंजुळे, श्रीमती पवार, श्रीमती इनामदार यांनी नाट्यगृह सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत समाधान व्याक्त केले. हा कलावंतांसाठी महत्त्वाचा दिवस असल्याचे मंजुळे म्हणाले. प्रास्ताविकात श्री.राजेभोसले म्हणाले, सांस्कृतिक विकासासाठी मोठी तरतूद करून शासनाने कलेला राजाश्रय दिला आहे. त्यामुळे कलाकारांना कौतुकाची थाप मिळेल.

प्रारंभी श्री.पवार यांनी बालगंधर्व यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले. कार्यक्रमाला नाट्यसृष्टीशी संबंधित कलाकार आणि कलारसिक उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.